नाकात औषध टाकून आता कोरोना व्हायरसला रोखता येणार !
नवी दिल्ली(वृत्तसंस्था)। जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसला रोखायचं कसं असा सर्वांसमोर सध्या प्रश्न आहे. त्यावर औषध निघालेलं नसलं तरी व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठीचं संशोधनही प्रगतीप्रथावर आहे. अमेरिकेतल्या संशोधकांनी नाकात टाकता येणारं औषध विकसित केलं असून त्यामुळे व्हायरसला प्रतिबंध करता येणार आहे. या औषधाचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला असून त्याचे चांगले परिणाम दिसून आल्याचं शास्रज्ञांनी म्हटलं आहे.
हे औषध जर नाकात टाकलं तर ते श्वसन नलिकेत व्हायरसला अटकाव करते. कोरोनाचा व्हायरस हा बहुतांश वेळा श्वसन नलिकेतून शरीरात प्रवेश करतो असं सिद्ध झालं आहे. त्यामुळे त्याला तिथेच रोखता येतं असं तज्ज्ञांचं मत आहे. दरम्यान, कोरोनावर लस तयार झाली तर ती जगभर पोहोचवायची कशी ही सर्वात मोठी समस्या सध्या जगासमोर आहे. यावर जागतिक आरोग्य संघटनेने WHO एक मेगा प्लान तयार केला आहे. तो सर्व देशांना दिला जाणार आहे. याची अंमलबजावणी सक्तीची नसली तरी तो मार्गदर्शक तत्व म्हणून उपयोगी होणार आहे. कोरोनावर लस आली तर ती सर्वात आधी जगात सर्वाधिक गरज असलेल्या भागात पोहचावी, त्यानंतर त्या नुसार त्याचा क्रम असावा, गरीब देशांनाही ती योग्य वेळेत मिळावी असं WHOने म्हटलं आहे.
ती लस वयोवृद्ध नागरीक, शुगर, ब्लड प्रेशर असे आजार असलेले नागरीक यांना ती आधी दिली पाहिजे असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. लस तयार झाल्यावर त्याचं अतिशय मोठ्या प्रमाणात उत्पादन करणं आणि ती लस जगातल्या काना कोपऱ्यात पोहोचवणं हे मोठं आव्हान असून पुण्यातली सीरम ही औषध निर्माता कंपनी यात मोठी भूमिका बजावणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत कोरोना व्हायरस पृथ्वीपासून नष्ट होईल अशी आशा व्यक्त केली आहे. स्पॅनिश फ्लूपेक्षाही कोरोनाचा विषाणू नष्ट होण्यासाठी कमी वेळ लागेल अशी अशा जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संसर्गाचा वेग दुप्पट झाला आहे त्यामुळे वेगानं पसरत आहे.