राज्यात आज वादळी वारा व गारपिटीसह पावसाचा इशारा, तर काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर, काही ठिकाणी उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
आज नाशिक, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पुण्यात आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.त्याच प्रमाणे धुळे, नंदुरबार, बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांमध्येही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.
जळगाव मध्ये काल 42.7 °C इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव मध्ये शुक्रवारी झालेली राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. आज मुंबईसह पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणातील तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तसंच उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. तसेच मुंबई शहर आणि उपनगरात आकाश आज मुख्यतः निरभ्र राहील. शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.