श्री आदिशक्ती मुक्ताबाई फिरता नारळी सप्ताहात नवरात्र निमित्त नऊ सख्या बहिणींचे पूजन
कुंभारखेडा/बलवाड़ी. ता रावेर. मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी |महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेल्या श्री आदिशक्ती मुक्ताबाई फिरता नारळी सप्ताहात भक्तीमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात सुरू आहेत. या सप्ताहाचे मार्गदर्शन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज करीत आहेत. सप्ताहादरम्यान दररोज सकाळी काकड आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, कीर्तन तसेच तरुणांसाठी ज्ञानेश्वरी चिंतन असे विविध अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यामुळे परिसरात भक्ती व अध्यात्माचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, सप्ताहामध्ये आलेल्या एका लहान मुलीची महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आपुलकीने विचारपूस केली असता, त्या मुलीकडून अत्यंत भावस्पर्शी माहिती समोर आली. संबंधित कुटुंब हे भटके,आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून त्या कुटुंबात नऊ सख्या बहिणी आणि माधव नावाचा एक भाऊ असल्याचे समजले. त्यांच्या वडिलांचे नाव मनुभाई गवळी (काठेवाडी) व आईचे नाव इत्तेमा गवळी (काठेवाडी) असे असल्याचे त्यांनी सांगितले. हे कुटुंब गोसेवा करतात. त्यांना घेऊन राना रानात भटकून गाईंना चरण्यासाठी विविध परिसरामध्ये फिरून गोसेवा करतात.
या नऊ मुलींना नवरात्र उत्सवानिमित्त ‘नवदुर्गा’ व आदिशक्ति मुक्ताबाई मानून सप्ताहामध्ये त्यांचे विशेष जेवण,कपडे, भेट वस्तू देऊन पूजन करण्यात आले. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलींचे विधीवत व मनोभावे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित भाविकांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले. “धन्य आहे ती माऊली, आणी धन्य आहे ते पिता ज्या माता पितांनी या नवदुर्गांना(नऊ सख्या बहिणींना) जन्म दिला,” अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. या उपक्रमामुळे सप्ताहाला एक वेगळीच आध्यात्मिक व सामाजिक उंची लाभल्याचे भाविकांनी सांगितले.
सप्ताहाच्या निमित्ताने परिसरातील हजारो भाविक दर्शन व कीर्तनाचा लाभ घेत असून कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त या नवदुर्गांचा सन्मान करून महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराजांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. याप्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज, वै. डीगंबर महाराज संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, रवींद्र भैय्या पाटील, प्रदीप पाटील, राजू महाजन ,संजीव महाजन,नकुल पाटील व इतर साधू संत, मान्यवर उपस्थित होते.
