१२ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण, मुलीची सुटका, तरुणाला अटक
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील के-हाळा येथील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेलेल्या मुलीचा शोध लाऊन तिला सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले असून मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्या बरोबर पळवून नेलेल्या आरोपी तरुणाला रावेर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या संदर्भात रावेर पोलीस स्टेशन येथे रुमा पुन्या भिलाला (रा. चोपाली, ता. झिरण्या, जि. खरगोन, मध्य प्रदेश, ह.मु. के-हाळा, ता. रावेर) यांनी फिर्याद दिली होती. की अज्ञात इसमाने त्यांच्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले आहे. या प्रकरणात नातेवाईकांची चौकशी आणि तांत्रिक विश्लेषण या आधारे पोलिसांनी गुन्ह्यातील मुलीची माहिती काढली. त्या माहिती नुसार संशयित राज्या उर्फ सोन्या बारेला (रा. केऱ्हाळा बु., ता. रावेर) याचा सोलापूर जिल्ह्यातील अकलुज येथून मोठ्या शिताफीने माग काढत त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत पीडित मुलीलाही ताब्यात घेऊन सुखरूप रावेर येथे आणण्यात आले. त्यानंतर मुलीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन हे करत आहेत. पो.हे.कॉ. विष्णू भिल, पो.कॉ. सचिन घुगे, पो.कॉ. नितीन सपकाळे, म.पो.कॉ. उज्वला पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (जळगाव), उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप (चोपडा) आणि अतिरिक्त कार्यभार फैजपूर विभाग पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

