Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

raver

माजी मुख्याध्यापिका ललिता हुना किरंगे यांच्या अमृत महोत्सवी वाढ दिवसा निमित्त नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावल ला एक लाख रुपयांचा डिजिटल स्मार्ट बोर्ड भेट

सावदा. ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज| नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावलच्या माजी मुख्याध्यापिका ललिता हुना किरंगे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करत त्यांनी शाळेला रु. १,००,०००/- किमतीचा अत्याधुनिक डिजिटल स्मार्ट बोर्ड भेट देऊन शिक्षणासाठी पुन्हा एकदा आपली बांधिलकी जपली.
किरंगे यांनी सन १९८५ ते २००९ या कालावधीत नूतन प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्य करत शाळेला आदर्श शाळेचा दर्जा मिळवून दिला. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे शाळेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रगतीला नवी दिशा मिळाली. विद्यार्थीकेंद्री शिक्षण, शिस्त, गुणवत्ता आणि संस्कार यांचा सुंदर संगम घडवत त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल केले.


त्यांच्या कार्यकाळात मुरलीधर देवराम पाटील (माजी मुख्याध्यापक), ठगू कृष्णा नेमाडे व इंदू जनार्दन भारंबे (माजी उपशिक्षक) यांनीही मोलाचे योगदान देत शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले. या सर्व शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे शाळेच्या प्रगतीचा भक्कम पाया रचला गेला.अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात शाळेचे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक, उपशिक्षक, तसेच विद्यमान मुख्याध्यापक व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण प्रसारक मंडळ, चिनावल तसेच नूतन प्राथमिक विद्यामंदिरच्या वतीने ललिता किरंगे यांच्यासह सर्व माजी शिक्षकांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.


या कार्यक्रमासाठी तुषार किरंगे व त्यांचे संपूर्ण कुटुंब अमेरिकेतून विशेषतः उपस्थित राहिले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक व कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील भास्कर महाजन, अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ, चिनावल होते. यावेळी खेमचंद्र गोवर्धन पाटील (चेअरमन), गोपाळ देवचंद पाटील (सचिव), राजेंद्र वामन फालक (उपाध्यक्ष), अनिल सुधाकर किरंगे (संचालक), दामोदर यादव महाजन (संचालक), गिरीश किरंगे व त्यांचे कुटुंबीय यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गणेश बाविस्कर यांनी केले. त्यांनी सौ. ललिता किरंगे यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हर्षाली कोल्हे यांनी डिजिटल स्मार्ट बोर्डच्या प्रभावी वापराचे महत्त्व विशद करून आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची आवश्यकता अधोरेखित केली.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सपना टोके, विनिता नारखेडे, कविता नेमाडे, मिलिंद गारसे, कविता पाटील या शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन भावना नेमाडे यांनी केले, तर अध्यक्षीय भाषणानंतर संतोष आसाराम काळे यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक व सर्व उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी ऋतुजा किरंगे व सार्थक किरंगे यांनी आपल्या आजीविषयी मनोगत व्यक्त करत त्यांच्या प्रेमळ स्वभाव, कर्तृत्व आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या मनोगतामुळे सभागृहातील वातावरण भावूक झाले.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकेतर कर्मचारीवृंदांनीही मोलाचे सहकार्य केले. माजी शिक्षकांचा गौरव, आधुनिक शिक्षणासाठी डिजिटल स्मार्ट बोर्डची देणगी आणि सर्व पिढ्यांना एकत्र आणणारा हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशा उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!