जळगाव मध्ये धक्कादायक : लाचलुचपत विभागाच्या कारवाईनंतर मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या सीलबंद घरात प्रवेश करणाऱ्या दोघांना अटक .….
जळगाव, मंडे टु मंडे न्युज | लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अकोला येथे भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई केलेल्या सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (वर्ग-१) किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्या जळगावातील सीलबंद राहत्या घरात घुसखोरीचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे.
शहरातील गणेश कॉलनी परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने सील केलेल्या घरात घुसखोरी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
अकोला येथील लाचलुचपत प्रकरणात अडकलेल्या सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगावातील सीलबंद घरात शिडी लावून प्रवेश करणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले. घराचे कुलूप तोडून मागील बाजूने शिडीच्या साहाय्याने आत प्रवेश करणाऱ्या दोघांना जळगाव पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला यांनी काही दिवसांपूर्वी किरण चौधरी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली होती. त्या अनुषंगाने जळगावातील साईप्रभा आर्केड, गणेश कॉलनी येथील त्यांच्या राहत्या घराची घरझडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याने एसीबीच्या जळगाव पथकाने सदर घर सीलबंद करून सुरक्षित ठेवले होते. शनिवारी रात्री उशिरा घरातून संशयास्पद आवाज येत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने याबाबत एसीबीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता घराच्या मागील बाजूने शिडी लावून दोन जण आतमध्ये प्रवेश केल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत प्रसाद नारखेडे (रा. डांभुर्णी, ता. यावल) आणि प्रवीण महाजन (रा. गणेश कॉलनी, जळगाव)
या दोघांनाही जागीच ताब्यात घेतले.
घरातील मौल्यवान वस्तू अथवा एसीबीच्या तपासासाठी महत्त्वाचे ठरू शकणारे पुरावे हटविणे किंवा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रसाद वसंत नारखेडे (३३, रा. डांभुर्णी, ता. यावल) आणि प्रवीण अशोक महाजन (३६, रा. गणेश कॉलनी, जळगाव) यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही संशयित हे किरण चौधरी यांचे नातेवाईक असल्याचे समोर आले आहे.


