सातपुडा पर्वतरांगां मधील डोंगरांना भीषण आग, २० किमी पर्यंत जंगल जळून खाक
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सातपुडा पर्वतरांगांमधील डोंगरांना भीषण आग लागलेली असून ही आग काही लागली हे अद्याप समोर आलेले नसले तरी कोळसा मिळावा यासाठी वनमाफियांकडून झाडाना आगी लावून वन पेटविले जात असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलांना भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. धडगाव तालुक्यात जवळपास १५ ते २० किलोमीटरपर्यंत जंगलाला आग लागली असून अनेक झाडं जळून खाक झाली आहेत. डोंगराला लागलेल्या या भीषण आगीत वनसंपत्ती जळून खाक झाली आहे. या सोबतच या आगीत अनेक जंगली प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाल्याचे ही सांगितले जात आहे.
वनविभागाच्या माध्यमातून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु अद्याप त्यांना आग विझविण्यात यश आलेले नाही. उलट आग वाढतच आहे. डोंगराच्या पायथ्याशी आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर पाडे आणि वस्त्या असल्याने त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे.
हरीण, माकड, बिबट्या, अस्वल, लांडगा, कोल्हा, मोर यासारखे अनेक प्राणी या जंगलात आढतात. जंगलाला आग लागल्यामुळे या आगीत या सारख्या अनेक प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात असून वनमाफियांच्या या भयानक कृत्यामुळे प्राण्याचे वास्तव्य नष्ट होत चालले आहे. पर्यायवरण प्रेमींकडून जंगल वाचवण्याची मागणी केली जात आहे.