शिक्षण विभागाचा मोठा दणका! राज्यातील २,९४० शाळा रडारवर ; बोगस पटनोंदणीचा खेळ उघड होणार?
६३९ शाळांमध्ये एकही विद्यार्थी आढळला नाही, तर १,२९८ शाळांमध्ये ५० ते ९९ टक्के विद्यार्थी गैरहजर
पुणे, मंडे टु मंडे न्युज || राज्यातील शाळांमध्ये कागदोपत्री विद्यार्थी संख्या दाखवून शासकीय योजनांचा लाभ घेतला जात असल्याच्या संशयाला आता शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतले आहे. राज्यस्तरीय पटपडताळणीत समोर आलेल्या धक्कादायक आकडेवारीनंतर शालेय शिक्षण विभागाने पुन्हा एकदा शाळांची सखोल पटपडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थीसंख्येच्या नोंदीत अनियमितता असलेल्या शाळांचे धाबे दणाणले आहेत.
राज्यात पहिली ते नववी आणि अकरावीच्या वर्गांची पटपडताळणी करण्यात आली होती. या तपासणीत तब्बल २,९४० शाळांमध्ये २५ ते ५० टक्के विद्यार्थी अनुपस्थित असल्याचे आढळले. त्याहून गंभीर बाब म्हणजे १,२९८ शाळांमध्ये ५० ते ९९ टक्के विद्यार्थी गैरहजर होते, तर तब्बल ६३९ शाळांमध्ये तपासणीच्या वेळी एकही विद्यार्थी उपस्थित नसल्याची नोंद झाली. या आकडेवारीमुळे शाळांच्या कागदोपत्री पटसंख्येवर आणि प्रत्यक्ष उपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पटावर विद्यार्थी, प्रत्यक्ष वर्गात मात्र शुकशुकाट!
शाळांच्या नोंदवहीतील विद्यार्थी संख्या आणि प्रत्यक्ष वर्गात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये मोठी तफावत असल्याचे या तपासणीतून समोर आले आहे. विद्यार्थीसंख्येच्या आधारे शाळांना विविध शासकीय सुविधा, शिक्षकांची पदे आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. त्यामुळे विद्यार्थीसंख्येच्या नोंदींमध्ये कोणतीही अनियमितता आहे का, याची तपासणी करणे आवश्यक झाले आहे.
काही शाळांमध्ये प्रत्यक्ष विद्यार्थी संख्या कमी असतानाही कागदोपत्री जास्त पट दाखवला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे बोगस विद्यार्थी नोंदणी करून शासकीय योजनांचा लाभ घेतला जात असल्यास त्यावरही या मोहिमेतून प्रकाश पडण्याची शक्यता आहे.

पुन्हा होणार शाळांची पटपडताळणी
पहिल्या टप्प्यातील पटपडताळणीत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अनुपस्थित आढळलेल्या शाळांची आता फेरतपासणी केली जाणार आहे. याशिवाय एप्रिल महिन्यात झालेल्या पटपडताळणीत ज्या शाळांची तपासणी होऊ शकली नव्हती, त्यांचाही नव्या मोहिमेत समावेश करण्यात आला आहे. शाळांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची आणि अधिकृत नोंदींची पडताळणी करून विद्यार्थीसंख्येतील तफावत शोधण्यावर भर दिला जाणार आहे.
एप्रिलमधील तपासणीतही समोर आले होते गंभीर चित्र
राज्यात ११, १५ आणि २२ एप्रिल २०२६ रोजी राज्यस्तरीय पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेनंतर संकलित आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले असता अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थिती मोठ्या प्रमाणात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आता पुन्हा तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.
या फेरपटपडताळणीत शाळांच्या पटावरील विद्यार्थीसंख्येचे वास्तव समोर येणार आहे. तसेच विद्यार्थीसंख्येच्या नोंदीत काही गैरप्रकार आढळतात का, याचाही उलगडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या या कारवाईकडे राज्यातील शाळांचे लक्ष लागले आहे.






