जळगाव जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध ; ३० लाख ३७ हजार मतदारांची नोंद
५ लाख १४ हजार ८३६ मतदारांची नावे प्रारूप यादीत नाहीत; दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत
जळगाव.मंडे टु मंडे न्युज |भारत निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील प्रारूप मतदार याद्या सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण ३० लाख ३७ हजार ४५६ मतदार आहेत. या प्रारूप मतदार याद्या संबंधित मतदान केंद्रे, तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये, मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये तसेच जिल्ह्याच्या jalgaon.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार
प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६, नोंदीतील दुरुस्तीसाठी नमुना ८, तर मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी नमुना ७ भरता येणार आहे. हे अर्ज voters.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध आहेत.
२९ ऑक्टोबरपर्यंत दावे-हरकतींचा निपटारा
३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विसंगत नोंदींबाबत नोटिसा बजावून सुनावणी घेण्यात येणार असून, प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा केला जाणार आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
निर्णयाविरुद्ध अपीलाचीही तरतूद
लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम २४ अंतर्गत अपीलाची तरतूद आहे. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध कलम २४(अ) नुसार जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे अपील करता येणार आहे. तसेच पहिल्या अपीलीय प्राधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध कलम २४(ब) नुसार, मतदार नोंदणी नियम, १९६० मधील नियम २७ अन्वये विहित पद्धतीने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे दुसरे अपील दाखल करता येणार आहे.
मतदान केंद्रांची संख्या वाढणार
जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या पूर्वीच्या ३ हजार ६७७ वरून प्रस्तावित ३ हजार ७०२ करण्यात आली आहे. नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून १९५० हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. हा क्रमांक सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. तसेच ECINET अॅपमधील ‘Book a Call With BLO’ या सुविधेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
५ लाख १४ हजार मतदारांची नावे प्रारूप यादीत नाहीत
गणनापत्रक (Enumeration Form) BLO कडे जमा न केलेल्या ५ लाख १४ हजार ८३६ मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. यामध्ये ९३ हजार ७०९ मयत मतदार, ९५ हजार ८०८ गैरहजर मतदार, २ लाख ६२ हजार ५४५ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, १ हजार ७४० इतर मतदार आणि यापूर्वीच नोंदणी झालेल्या ६१ हजार ३४ मतदारांचा समावेश आहे.
मयत मतदार वगळता पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी विहित कालावधीत दावे दाखल करावेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नवमतदारांनीही नोंदणी करण्याचे आवाहन
जिल्ह्यातील सर्व पात्र मतदार तसेच ‘Uncollectable’ वर्गवारीतील नागरिकांनी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे आपले दावे व हरकती दाखल करावेत.
तसेच १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकास किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी नमुना ६ भरून मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.


