Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

एतिहासिकयावल

यावल च्या ऐतिहासिक निंबाळकर किल्ल्याची भिंत कोसळली; मोठमोठे दगड ढासळत असल्याने नागरिकांमध्ये भीती!

ऐतिहासिक वास्तूच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह; किल्ल्यालगतच्या १०० ते १२५ घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर  

यावल.मंडे टु मंडे न्युज || शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या निंबाळकर किल्ल्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून, गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे चार वाजेच्या सुमारास किल्ल्याची एक भिंत अचानक कोसळली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र किल्ल्यातील जुन्या दगडी बांधकामाची मोठ्या प्रमाणावर पडझड सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावल शहरातील अति प्राचीन निंबाळकर किल्ल्याच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याने मोठमोठे दगड आणि मातीचे ढिगारे परिसरात पडले आहेत. किल्ल्याची अवस्था पाहता उर्वरित बांधकामही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, यावल न्यायालयापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर आणि नगर परिषद कार्यालयापासून सुमारे २०० ते २५० मीटर अंतरावर हा किल्ला आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कार्यवाही सुरू केली.

१०० ते १२५ घरांवर संभाव्य धोक्याचे सावट

किल्ल्याच्या भिंतीलगत अंदाजे १०० ते १२५ कच्ची व पक्की घरे असून, या घरांमध्ये अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत. किल्ल्याच्या भिंतींची पडझड अशीच सुरू राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने केवळ कोसळलेला भाग हटविण्यापुरती कार्यवाही न करता संपूर्ण किल्ल्याच्या भिंतींची तांत्रिक तपासणी करावी. धोकादायक भाग निश्चित करून आवश्यक त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

गरज भासल्यास किल्ल्यालगत राहणाऱ्या नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची व्यवस्था करण्याचीही मागणी पुढे येत आहे.

मोठमोठे दगड कोसळत असल्याचे व्हिडिओतून स्पष्ट

निंबाळकरांच्या या ऐतिहासिक किल्ल्यातील जुन्या दगडी बांधकामाची अवस्था अत्यंत चिंताजनक झाली आहे. वर्षानुवर्षे ऊन, वारा आणि पावसाचा मारा सहन करणाऱ्या या वास्तूची योग्य देखभाल व दुरुस्ती न झाल्याने ठिकठिकाणी बांधकाम ढासळत असल्याचे दिसून येत आहे. किल्ल्यातील मोठमोठे दगड कोसळून दगड-मातीचे ढिगारे तयार होत असल्याचे व्हिडिओतूनही स्पष्ट झाले आहे.

ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी ठोस कृती आराखडा हवा

निंबाळकरांचा किल्ला हा यावलच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा ठेवा आहे. मात्र या वास्तूची होत असलेली पडझड पाहता तिचे अस्तित्व टिकविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पुरातत्त्व विभाग, महसूल विभाग, नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे किल्ल्याची पाहणी करून तज्ज्ञांच्या माध्यमातून स्ट्रक्चरल ऑडिट करावे. तसेच ऐतिहासिक वास्तूचे मूळ स्वरूप जपून शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धनाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.

किल्ल्यालगत झालेल्या अतिक्रमणांबाबत यापूर्वी कोणती कार्यवाही झाली, धोकादायक बांधकामांबाबत रहिवाशांना सूचना देण्यात आल्या आहेत का आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या स्थलांतरासाठी काय नियोजन आहे, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.

प्रशासन आणखी किती काळ प्रतीक्षा करणार?

आजपर्यंत सुदैवाने किल्ल्याची भिंत कोसळून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन पाहणार आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. यावलच्या ऐतिहासिक वैभवाची ओळख असलेला निंबाळकरांचा किल्ला डोळ्यांसमोर ढासळत असताना संबंधित विभागांनी तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि किल्ल्यालगत राहणाऱ्या नागरिकांची सुरक्षा या दोन्ही बाबींना प्राधान्य देऊन प्रशासनाने त्वरित ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावलकर व्यक्त करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!