झेडपी, पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्तीचा मार्ग मोकळा; ग्रामविकास विभागाचे महत्त्वपूर्ण निर्देश! जिल्हा परिषदेत १० टक्के किंवा किमान ५, तर पंचायत समितीत २० टक्के किंवा किमान १ सदस्य नियुक्त
जळगाव. मंडे टु मंडे न्युज || जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत (नामनिर्देशित) सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता राखण्यासाठी ग्रामविकास व पंचायतराज विभागाने महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या १० टक्के किंवा किमान ५ सदस्य, तर पंचायत समितीत २० टक्के किंवा किमान १ सदस्य नियुक्त केला जाणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात राजकीय प्रतिनिधित्वासोबतच विविध क्षेत्रांतील अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तींनाही संधी मिळणार आहे.
ग्रामविकास विभागाने निश्चित केलेल्या निकषांनुसार नामनिर्देशित सदस्यांची संख्या ठरविताना अर्ध्यापेक्षा कमी अपूर्णांक वगळला जाणार आहे, तर अर्धा किंवा त्यापेक्षा अधिक अपूर्णांक असल्यास त्याची गणना पूर्णांक म्हणून केली जाणार आहे. विशेष म्हणजे, राजकीय पक्ष, गट आणि आघाडी यांच्या निवडून आलेल्या सदस्यांच्या संख्याबळाच्या प्रमाणात स्वीकृत सदस्यांच्या जागांचे वाटप केले जाणार आहे. जागांच्या वाटपात समान अपूर्णांक निर्माण झाल्यास सोडतीद्वारे निर्णय घेतला जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे नियुक्ती प्रक्रियेची महत्त्वाची जबाबदारी
स्वीकृत सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेत जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. जिल्हाधिकारी संबंधित राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा आणि सल्लामसलत करून पात्र व्यक्तींच्या नावांची शिफारस करतील. मात्र, शिफारस केलेले नाव नाकारण्यात आल्यास त्यामागील कारणे लेखी स्वरूपात नोंदविणे बंधनकारक असेल. यामुळे नियुक्ती प्रक्रियेत मनमानीला आळा बसण्यासोबतच पारदर्शकता राखण्यास मदत होणार आहे.
या क्षेत्रांतील तज्ज्ञांना मिळणार संधी
वैद्यकीय, शिक्षण, कृषी, जलसंधारण, सहकार, ग्रामीण विकास, महिला व बालविकास, कला, साहित्य, समाजकार्य, अभियांत्रिकी आणि विधी अशा विविध क्षेत्रांत अनुभव व विशेष प्रावीण्य असलेल्या व्यक्तींना स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्तीची संधी मिळणार आहे. या तज्ज्ञांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या विकासकामांसाठी तसेच धोरणात्मक निर्णय प्रक्रियेसाठी होऊ शकणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार : जयकुमार गोरे
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या निर्णयाबाबत सांगितले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे कामकाज अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि परिणामकारक व्हावे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. विविध क्षेत्रांतील अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात सहभागी करून घेतल्यास ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळेल. राजकीय संख्याबळाचा विचार करून निश्चित निकषांनुसार ही प्रक्रिया राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता राखून गुणवत्तेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या संदर्भात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग सुकर होणार असून, ग्रामीण विकासाच्या निर्णय प्रक्रियेत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा सहभाग वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

