भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

चोपडा

चोपडा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी पाड्यावर प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू; रस्ते, पाणी आणि आरोग्य सुविधांचा प्रश्न ऐरणीवर!

चोपडा | मंडे टु मंडे न्यूज. सचिन पाटील || चोपडा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या बिलक्या पाणी येथील आदिवासी पाड्यावर एका महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २१ ऑक्टोबर २०२६ रोजी घडली. या घटनेमुळे दुर्गम भागातील रस्ते, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित पाड्यावर जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे.

घरीच झाली प्रसूती; प्रकृती खालावल्याने आरोग्य पथक धावले

मिळालेल्या माहितीनुसार, रियांनीबाई दाड्या खवाऱ्या पावरा या महिला बोरमळी गावापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावरील बिलक्या पाणी येथील माहेरी राहत होत्या. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच्या घरीच प्रसूती झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावल्याची माहिती वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य विभागाला मिळाली.

माहिती मिळताच वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन मराठे, डॉ. सुनील बारेला, डॉ. प्रशांत बोरसे तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी आणि आरोग्य सेविका यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, संबंधित महिला शुद्धीवर नसल्याने तिला तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. प्रसाद पाटील यांनी तपासणीनंतर महिलेला मृत घोषित केले.

नवजात बाळाची प्रकृती चांगली

या प्रसूतीत जन्मलेल्या पुरुष जातीच्या बाळाची प्रकृती चांगली असल्याची माहिती देण्यात आली. बाळाचे अंदाजे वजन तीन किलोग्रॅम असल्याचे सांगण्यात आले. आईचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रस्त्याअभावी ग्रामस्थांची कसरत

बिलक्या पाणी हा पाडा अतिदुर्गम भागात असल्याने तेथे पोहोचणे अत्यंत कठीण असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पाड्यावर जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे प्रसूतीनंतर महिलेला गावाबाहेर आणण्यासाठी ग्रामस्थांनी दोन बांबूंच्या साहाय्याने तात्पुरती झोळी तयार केली. अशा परिस्थितीत रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहोचविण्याचे मोठे आव्हान निर्माण होते.

या भागात पिण्याचे पाणी, वीज, सौरऊर्जा आणि आरोग्य सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारीही ग्रामस्थांनी केल्या आहेत. गावाचा नकाशावर स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे स्थानिक कर्मचारी आणि आरोग्य यंत्रणेला या पाड्याची माहिती मिळण्यात अडचणी येत असल्याचेही सांगण्यात आले.

स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल

बोरमळीचे सरपंच प्रल्हाद पावरा, भाजपचे सदस्य पिंटू पावरा तसेच मालापूर, बोरवडी परिसरातील समाजसेवक सचिन पावरा, प्रमोद पावरा आणि नामा पावरा यांच्यासह स्थानिकांनी मदत करून महिलेला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले.

घटनेनंतर यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार, आमदार चंद्रकांत सोनवणे आणि चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी मृत महिलेच्या नातेवाइकांची भेट घेऊन विचारपूस केल्याची माहिती आहे.

अंत्यविधीसाठीही रस्त्याचा प्रश्न

महिलेच्या मृत्यूनंतर आता अंत्यविधीसाठी पार्थिव कसे न्यावे, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला आहे. २२ ऑक्टोबर रोजी अंत्यविधीचे नियोजन करण्यात आले होते; मात्र रस्त्याअभावी पार्थिवाची वाहतूक करणेही कठीण असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी नियमित आरोग्य सेवा, रस्ते, पिण्याचे पाणी आणि वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. महिला व बालविकास विभागासह संबंधित शासकीय यंत्रणांनी या भागाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रश्न एकच — दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यासाठी प्रशासन ठोस पावले कधी उचलणार?

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!