जळगाव मध्ये तरुणाचा चाकूने सपासप वार करीत निर्घृण खून, एक गंभीर जखमी
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव शहरातील सम्राट कॉलनीतील धीरज दत्ता हिरवाडे (२४, रा. सम्राट कॉलनी, जळगाव) या तरुणाचा आज २७ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जुन्या वादातून चाकूने सपासप वार करीत निर्घुण खून करण्यात आला .
गेल्या काही दिवसांपासून धीरज चे काही तरुणांसोबत वाद होते. या वादातून रविवार, २७ जुलै रोजी दुपारी तीन वाजता न्यू जोशी कॉलनी परिसरात पाण्याच्या टाकीजवळ धीरजचे मारेकरी तरुणासह वाद झाले. या वादात धीरजला छातीवर, चेहऱ्यावर, डाव्या हातावर गंभीर वार करण्यात आले.
त्यात तो गंभीर जखमी झाला.त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र अति रक्तस्त्राव झाल्यामुळे तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. या घटनेमध्ये कल्पेश भटू चौधरी (वय २३, रा. सम्राट कॉलनी) हा देखील गंभीर जखमी झाला.
दरम्यान परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांसह एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृताच्या पश्चात आई, वडील, बहिण असा परिवार आहे.

