अवैध वाळू वाहतुकी विरोधात वनविभागाची कारवाई, पुन्हा वाळूने भरलेले वाहन जप्त
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील पाल परिसरात अवैध वाळू वाहतुकीविरोधात वनविभागाची धडक कारवाई सुरूच आहे. वनविभागाने पुन्हा एकदा कारवाई करत गारबर्डी ते पाल रस्त्यावरील यावल अभयारण्यातील कक्ष क्रमांक २८ मधील हेंकडझिरा तपासणी नाक्याजवळ वनविभागाच्या गस्ती पथकाने रात्री ८.४५ च्या सुमारास एक विना क्रमांक स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना मिळून आले. सदर ट्रॅक्टर लागलीच जप्त करण्यात आले असून त्यास वन्यजीव पाल वनक्षेत्र कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती शितल नगराळे यांनी पदभार स्वीकारल्या नंतर अवघ्या पंधरा दिवसांत ही दुसरी कारवाई आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक यावल अभयारण्य सत्यजीत निकत, वनसंरक्षक मंगेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) शितल नगराळे यांच्या नेतृत्वात वनपाल संभाजी सूर्यवंशी, रजनी घोडके, वनरक्षक राजमल बारेला, संजय बारेला, जगदीश बारेला, धनाबाई भादले, सकिना तडवी, सविता बारेला तसेच वनमजूर आदील मन्यार, अमोल चव्हाण, बबलू खान, परमान तडवी आदींनी सहभाग घेतला.
अवैध वाळू वाहतुकीस आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरूच राहणार असून कोणत्याही प्रकारची वन हद्दीतील वाळू तस्करी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा विभागाकडून देण्यात आला आहे.
