जळगाव मेडिकल कॉलेज मध्ये रॅगिंगचा आरोप ; विद्यार्थ्याच्या तक्रारीने खळबळ
जळगाव.मंडे टु मंडे न्युज | जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने रॅगिंगबाबत गंभीर आरोप केल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
विद्यार्थ्याने महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून आपल्याला त्रास दिला जात असल्याचा दावा केला आहे.
विद्यार्थ्याच्या आरोपानुसार, काही विद्यार्थ्यांकडून त्याला बाथरूममध्ये नेऊन मारहाण करण्यात आली. तसेच पट्ट्याने मारहाण करणे आणि बाहेरील मुलांना खोलीत बोलावून त्यांच्याकडून मारहाण करवून घेणे, असे गंभीर प्रकार घडल्याचा त्याचा दावा आहे.
या प्रकाराबाबत तक्रार केल्यानंतर आपल्यालाच मानसिकदृष्ट्या आजारी ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसेच शिक्षणापासून दूर करून घरी बसवण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप विद्यार्थ्याने केला आहे. विद्यार्थ्याच्या आईनेही या प्रकरणाबाबत गंभीर आक्षेप नोंदवल्याचे वृत्त आहे.
महाविद्यालय प्रशासनाची भूमिका काय?
दरम्यान, विद्यार्थ्याने केलेले आरोप महाविद्यालय प्रशासनाने फेटाळले आहेत. विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर तीन ते चार वेळा समितीमार्फत चौकशी करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. या चौकशीत रॅगिंगचे कोणतेही तथ्य आढळले नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
तक्रारीच्या आधारे चौकशी करून अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्याने केलेले गंभीर आरोप आणि महाविद्यालय प्रशासनाची त्यावरील वेगळी भूमिका यामुळे या प्रकरणाची पुढील चौकशी आणि त्यातून समोर येणारे तथ्य महत्त्वाचे ठरणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासारख्या संस्थेत विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि रॅगिंगविरोधी यंत्रणेची प्रभावी अंमलबजावणी याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहे


