अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याच्या रागातून मुलीच्या भावावर धारदार शास्त्राने हल्ला
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महाविद्यालयात बॅडमिंटन खेळणाऱ्या अल्पवयीन मुलींकडे शिट्ट्या वाजवून अश्लील कमेंट करणाऱ्या विद्यार्थ्यांना जाब विचारणाऱ्या पिडीत मुलीच्या चुलत भावासह त्याच्या मित्रांवर महाविद्यालयातील तीन अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता भुसावळ शहरात घडली.या घटनेने मुलींच्या पालकां कडून चिंता व्यक्त केली जात आहे.
१७ वर्षीय पिडीत मुलगी ही बी.कॉम चे शिक्षण घेत असून, गुरुवारी सकाळी आपल्या मैत्रिणींसोबत महाविद्यालयात बॅडमिंटन खेळत होती. त्याचवेळी महाविद्यालयात शिकणारे तीन टवाळखोर अल्पवयीन मुले शिट्ट्या वाजवत अश्लील कमेंट करू लागले. हा प्रकार पाहून मुलीच्या चुलत भावाने व त्याच्या मित्रांनी त्यांना थांबवत जाब विचारला की, “तुझ्या बहिणीला असे कोणी केले तर चालेल का?” या उलट्या प्रश्नाने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी चिडून शिवीगाळ करत भावावर व त्याच्या मित्रांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच पिडीत मुलींना अश्लील हावभाव करून विनयभंग केला.
या प्रकरणानंतर पिडीत मुलीने तत्काळ भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून रात्री उशिरा सुमारे ११ वाजता तीन अल्पवयीन मुलांवर जबर मारहाण, शिवीगाळ, विनयभंग आणि धारदार हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

