१८ तलवारींचा साठा जप्त, एक जण ताब्यात
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अवैधरित्या तलवारी बाळगणाऱ्या सोहेल शेख तय्यब शेख (वय २४, रा. स्मशान भूमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा) या तरुणाला पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या कडून तब्बल १८ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत .या तलवारींची किंमत अंदाजे ५४,००० रुपये होत आहे. ही घटना पाचोरा शहरात घडली.
या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पाचोरा येथील माहिजी नाका परिसरात तलवारी विक्रीसाठी आणल्याची खबर पोलिसाना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सोहेल शेखला ताब्यात घेतले. त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने लपविलेल्या १८ तलवारी काढून दिल्या. या तलवारी पोलिसांनी जप्त केल्या असून यापूर्वीही त्याने तलवारी विक्री केल्या असल्याचे त्याने सांगितले.
पाचोरा पोलिस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनिरी. कृष्णा घायाळ, पोउपनिरी. कैलास ठाकुर, पोकॉ संदीप राजपुत, पोकॉ जितेंद्र पाटील, पोकॉ हरीश परदेशी यांनी केली.
