चोपड्यात बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला!
चोपडा.मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी || चोपडा शहरातील श्रीरामनगर परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी ट्युशनवरून घरी परतणाऱ्या अवघ्या बारा-तेरा वर्षांच्या बालकाला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली. ही घटना दिनाक २३ नोव्हेंबर सोमवार रोजी संध्याकाळी घडली.

घटनेचा तपशील असा की, श्रीरामनगर बोर्डपासून काही अंतरावर हा बालक सायकलने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी त्याच्या सायकलला पाय मारून त्याला खाली पाडले. त्यानंतर त्याला गोणपाटात टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्यासोबत काही अंतरावर चालत असलेल्या मित्रांना त्याच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी तातडीने आरडाओरडा केला. त्याचवेळी जवळच असलेल्या घरातील महिलांनाही आवाज ऐकू आल्याने त्यांनी तत्काळ घराचा दरवाजा उघडला. या सर्वांच्या प्रसंगावधानामुळे त्या बालकाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून वाचविण्यात यश आले.

घाबरलेल्या बालकाने घडलेला संपूर्ण प्रकार महिलांना सांगितला. आवाज ऐकून परिसरातील नागरिकही घटनास्थळी जमा झाले. याचदरम्यान, एका मुलाने त्यांच्या मागे मध्य प्रदेश (MP) पासिंगची एक इको व्हॅनदेखील असल्याचे सांगितले. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले.
मी स्वतः त्या परिसरातून जात असताना हा प्रकार घडल्याचे समजले. विशेष म्हणजे, संबंधित महिला आपल्या हातेड गावच्या असल्याने त्यांनी मला घडलेला प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मी क्षणाचाही विलंब न करता चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

पवन देसले यांनीही घटनेची तत्काळ दखल घेत सात ते आठ पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून संभाव्य मार्गांवरील राज्याच्या सीमेवरील चेकपोस्टवरही संपर्क साधला. तसेच संबंधित बालक व त्याच्या पालकांना पुढील चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
या गंभीर घटनेची माहिती मिळताच तातडीने प्रतिसाद देणारे पोलीस निरीक्षक पवन देसले आणि त्यांचे सर्व सहकारी पोलीस कर्मचारी यांनी नागरिकांची सुरक्षितता हीच आपली प्राथमिकता मानून पोलिसांनी दाखवलेली तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे.

नागरिकांना कळकळीचे आवाहन!
ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे पालकांनी आणि नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
- पालकांनी आपल्या मुलांना शक्यतो एकट्याने ट्युशनला पाठवू नये. येण्या-जाण्याची व्यवस्था विश्वासार्ह व्यक्तीमार्फत करावी.
- संध्याकाळच्या वेळी अंधाऱ्या रस्त्यांवरून मुलांनी एकट्याने प्रवास करणे टाळावे.
- अनोळखी व्यक्ती, संशयास्पद दुचाकी किंवा चारचाकी वाहनांपासून सावध राहावे.
- मुलांना कोणी अडवले, पाठलाग केला किंवा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर मोठ्याने ओरडावे आणि जवळच्या सुरक्षित ठिकाणी मदत मागावी.
- परिसरातील नागरिकांनी संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष करू नये. मात्र, स्वतःहून धोका पत्करण्याऐवजी तातडीने पोलिसांना कळवावे.
- कोणतीही संशयास्पद घटना दिसल्यास तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

एक गोष्ट लक्षात ठेवा… आपल्या घरातील मुलांची सुरक्षितता ही केवळ त्या कुटुंबाची जबाबदारी नाही, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. आज दुसऱ्याच्या मुलावर आलेले संकट उद्या आपल्या दारातही येऊ शकते. म्हणूनच सजग राहूया, सतर्क राहूया आणि एकमेकांच्या मदतीला धावून जाऊया.



