जमीन खरेदी-विक्रीच्या वादातून व्यावसायिक डॉक्टरांचा खून ; मृतदेह पोत्यात भरून धरणात फेकला, ८० लाखांच्या बयाण्याचा व्यवहार ठरला जीवघेणा
जळगाव/पाचोरा.मंडे टु मंडे न्युज. || जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे उघडकीस आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेले कन्नड येथील व्यावसायिक डॉ. संजय मनोहर तेली (वय ५२) यांची हत्या झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) सकाळी सुमारे ७ वाजता त्यांचा मृतदेह बहुळा धरणात आढळून आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोरा पोलिसांनी राहुल धर्मराज पाटील व त्याच्या सालदाराला ताब्यात घेतले आहे.

८० लाखांचा बयाणा, जमिनीच्या व्यवहारातून वाद
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. संजय तेली हे वैद्यकीय व्यवसायासोबतच जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करीत होते. गोराडखेडा येथील राहुल धर्मराज पाटील याच्या दोन एकर जमिनीचा १ कोटी २ लाख ५० हजार रुपयांना व्यवहार ठरला होता. या व्यवहारापोटी डॉ. तेली यांनी राहुल पाटील याला ८० लाख रुपये बयाणा दिला होता.
अखेरचा प्रवास ठरला जीवघेणा
दि. १७ नोव्हेंबर रोजी डॉ. तेली हे मुलीसोबत कन्नड येथून चारचाकी वाहनाने निघाले होते. मुलीला जळगाव येथील गोदावरी मेडिकल कॉलेज येथे सोडल्यानंतर ते पिंपळगाव हरेश्वर येथे शालकाकडून पाच लाख रुपये घेण्यासाठी गेले. त्यानंतर सांगवी (प्र. लोद) येथील घरी जाऊन त्यातील ३ लाख १० हजार रुपये ठेवले आणि उर्वरित १ लाख ९० हजार रुपये घेऊन ते १८ नोव्हेंबर रोजी गोराडखेडा येथे राहुल पाटील याच्याकडे पोहोचले.
तेथे जमीन व्यवहारावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून राहुल पाटील याने डॉ. तेली यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

मृतदेह पोत्यात भरून धरणात फेकल्याची कबुली
हत्येनंतर राहुल पाटील याने आपल्या सालदाराच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून जवळच असलेल्या बहुळा धरणात फेकून दिल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. डॉ. तेली हे १८ नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या शोधासाठी १ लाख २१ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोरा पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत या प्रकरणाचा उलगडा केला. संशयितांकडून मिळालेल्या माहितीनुसार २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून बहुळा धरणात शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने आरसीपी प्लाटूनसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सहा दिवसांनंतर मृतदेह हाती
अखेर सोमवारी, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास बहुळा धरणात डॉ. संजय तेली यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या घटनेमुळे पाचोरा तालुक्यासह कन्नड परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पाचोरा पोलिस करीत आहेत.





