गटविकास अधिकाऱ्याची मुजोरी, उपोषणास बसलेल्या तरुणाला उपोषण स्थळीच कानशिलात लगावली,व्हिडिओ व्हायरल! गटविकास अधिकारी राजेश इंगळे यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह!
जळगाव. मंडे टु मंडे न्युज || जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील विकासकामांच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाला आता वेगळे वळण मिळाले आहे. न्यायाच्या मागणीसाठी जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर आमरण उपोषण करणाऱ्या तरुणाच्या समर्थनार्थ आलेल्या दुसऱ्या तरुणाला पाचोरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याने कानशिलात लगावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील पंकज पाटील यांनी २ ऑक्टोबर रोजी गावाच्या विकासकामांबाबत माजी सरपंचांना जाब विचारला होता. त्यावेळी माजी सरपंचांनी पंकज पाटील यांना कानशिलात लगावल्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. या घटनेचा व्हिडिओदेखील त्यावेळी समाजमाध्यमांवर प्रसारित झाला होता. मात्र, या प्रकरणात अद्याप न्याय मिळाला नसल्याचा आरोप करत पंकज पाटील यांनी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे.

या उपोषणाला पाचोरा तालुक्यातील रोहित देसले यांनी पाठिंबा दर्शविला होता. दरम्यान, दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश इंगळे हे उपोषणस्थळी आले. यावेळी उपोषण मागे घेण्याच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू असताना दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
याचदरम्यान, पंकज पाटील यांच्या शेजारी अन्य मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या रोहित देसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या संभाषणाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण सुरू केले. त्यावेळी संतप्त झालेल्या गटविकास अधिकाऱ्याने रोहित देसले यांच्या कानशिलात लगावल्याचा आरोप आहे. या घटनेचे चित्रीकरण मोबाईलमध्ये झाले असून, संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने प्रसारित होत आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह
न्यायाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणस्थळी घडलेल्या या कथित प्रकारामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तनाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधताना संयम आणि जबाबदारी राखण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.
मात्र, या घटनेतील सर्व आरोपांची अधिकृत पडताळणी आणि संबंधित अधिकाऱ्यांची बाजू समोर येणे महत्त्वाचे आहे. व्हायरल व्हिडिओच्या आधारे नेमकी वस्तुस्थिती काय, याची चौकशी झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.






