भुसावळ हादरले…..पुजाऱ्याची निर्घुण हत्या! परिसरात घबराट…
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज | भुसावळ मधून एक धक्कादायक घटना आज सोमवार २९ जून रोजी सकाळी उघडकीस आली. शहरा जवळ असलेल्या मिलिटरी स्टेशन कॅम्पसच्या मागे आणि झेडटीआरआय बोगद्याजवळ भुसावळ ते खंडावा डाऊन रेल्वे लाईनला लागून असलेल्या कालिका माता मंदिराचे पुजारी संतोष रघुवीर मंचल. वय ५५ वर्ष. यांची अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात जड व टणक वस्तूने प्रहार करून निघृण हत्या केली.
या धक्कादायक घटनेने संपूर्ण भुसावळ शहर आणि रेल्वे परिसरात मोठी दहशत पसरली आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच्या दोन्ही मुलांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या ६ ते ७ वर्षांपासून संतोष मंचल कालिका माता मंदिराच्या आवारातील एका पत्राच्या खोलीत राहत होते आणि तिथल्या तीन मंदिरांची देखभाल, स्वच्छता व पूजा-अर्चा करत असत. संतोष मंचल यांना दररोज दारू पिण्याचे व्यसन होते आणि त्या अनुषंगाने घरात भांडणे देखील होत असत.
आज सोमवार दिनाक २९ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास जेव्हा एक व्यक्ती मंदिरात नेहमीप्रमाणे पूजा करण्यासाठी गेली, तेव्हा त्यांना मंदिराच्या बाजूला असलेल्या पत्राच्या खोलीपाशी संतोष मंचल यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच पूजाऱ्यांचे कुटुंबीय देखील मंदिरात पोहोचले, तेथे संतोष यांचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
घटनेची माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उप पोलीस अधीक्षक केदार बारबोले, स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी पोलीस फौजफाट्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर कोणत्यातरी जड वस्तूने जबर प्रहार करून त्यांना जागीच ठार केले असल्याचे प्राथमिक अंदाज करत पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.
हत्येचे कारण अस्पष्ट
या हत्येचे नेमके कुठलेही कारण अद्याप समोर आलेले नसून ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाला की घरगुती वादातून, याचा शोध पोलीस घेत असून जळगाव येथून तातडीने ठसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. पोलिस पुढील तपास करीत असून ‘पोलीस तपासात लवकरच सत्य बाहेर येईल’ असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.


