Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Uncategorized

बोगस ‘कृषी मित्र’ भरतीच्या नावा खाली बेरोजगार युवकांची दिशाभूल, जळगाव जिल्ह्यात खळबळ जनक प्रकार, कृषी विभागाची मोठी कारवाई..

जळगाव, मंडे टु मंडे न्युज | ‘कृषी मित्र’ पद भरतीच्या नावाखाली बेरोजगार युवकांची दिशाभूल करून परीक्षा शुल्क उकळणे आणि विना परवाना खत सदृश्य जैव उत्पादनांचे वितरण केल्याचा गंभीर प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने एका महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर धाड टाकून तब्बल २७३ जैव उत्पादनांची पाकिटे जप्त केली. या प्रकरणी संबंधित संस्था, उत्पादक कंपनी आणि जिल्हा समन्वयकाविरुद्ध खत नियंत्रण आदेश, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल  करण्यासाठी पोलिसात तक्रार देण्यात आली.

‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखाली बेरोजगार युवकांची फसवणूक करणाऱ्या टोळीवर जळगावच्या कृषी विभागाने धडक कारवाई केली आहे. दरमहा २५ हजार रुपये पगाराचे आमिष दाखवून एका खासगी संस्थेद्वारे जळगाव शहरातील एका मोठ्या महाविद्यालयात परीक्षा घेतली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

कृषी विभागाच्या पथकाने परीक्षा केंद्रावर छापा टाकला, तिथे १११ उमेदवार परीक्षा देत होते. उमेदवारांकडून २५० रुपये ऑनलाइन परीक्षा शुल्क घेण्यात आले होते. तसेच, परीक्षार्थ्यांना मोफत देण्याच्या नावाखाली केंद्रावर ‘क्रॉप बूस्टर’ या नावाची २७३ अनधिकृत जैव उत्पादने सापडली. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या महात्मा फुले कृषी विकास केंद्र (छत्रपती संभाजीनगर), हिंदुस्तान ॲग-टेक बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड (जालना) आणि स्थानिक समन्वयकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक येथील विभागीय कृषी सहसंचालकांच्या निर्देशानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्या नेतृत्वाखाली कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे आणि कृषी अधिकारी लक्ष्मण पाटील यांच्या पथकाने परीक्षा केंद्राची अचानक पाहणी केली. तपासादरम्यान केंद्रावर १११ उमेदवार परीक्षा देत असल्याचे आढळून आले. प्रत्येक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने २५० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आल्याची माहितीही समोर आली. परीक्षा केंद्रावर उमेदवारांना मोफत वाटपासाठी ठेवण्यात आलेले ‘क्रॉप बूस्टर (पोटॅशियम ह्युमेट ६५%) या नावाचे २५० ग्रॅम वजनाचे २७३ जैव उत्पादनांची पाकिटे, एकूण सात बॉक्समध्ये साठवून ठेवलेले आढळले. या उत्पादनाची तपासणी केली असता संबंधित उत्पादक कंपनीकडे कृषी विभागाचा वैध उत्पादक परवाना नसल्याचे दूरध्वनीद्वारे स्पष्ट झाले. त्यानंतर कृषी विभागाने खत नियंत्रण आदेश (FCO-1985) नुसार उत्पादनाचे नमुने अधिकृतरीत्या घेऊन शासकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले असून उर्वरित सर्व साठा जप्त करण्यात आला आहे.

प्राथमिक चौकशीत खासगी महात्मा फुले कृषी विकास केंद्र (छत्रपती संभाजीनगर), हिंदुस्तान ॲग-टेक बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड (जालना) तसेच जिल्हा समन्वयक राजकुमार लक्ष्मण जैन यांनी संगनमत करून विना परवाना जैव उत्पादकांची निर्मिती, विना बिल वाहतूक आणि वितरण केल्याचा आरोप कृषी विभागाने केला आहे. तसेच बनावट भरती प्रक्रियेच्या माध्यमातून उमेदवारांकडून परीक्षा शुल्क गोळा करून शासनासह बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.  अशाच स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये बुलढाणा , वाशीम , संभाजीनगर, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्येही संबंधितांविरुद्ध अधिकृत फिर्यादी दाखल करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली असून, या संपूर्ण रॅकेटचा तपास विविध जिल्ह्यांमध्ये सुरू असल्याचे समजते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!