धरणात बोट उलटली ; दोन तरुणींसह चौघे पाण्यात, तासभर मृत्यूशी झुंजले!…
जामनेर,मंडे टु मंडे न्युज || जामनेर तालुक्यातील पहूरजवळ असलेल्या गोगडी धरणात बोट उलटल्याची थरारक घटना घडली. या दुर्घटनेत दोन तरुणी, त्यांचा चुलत भाऊ आणि बोटचालक असे चौघे जण पाण्यात पडले. तब्बल तासभर उलटलेल्या बोटीचा आधार घेत चौघेही जीव वाचविण्यासाठी संघर्ष करत होते. दरम्यान, प्रसंगावधान राखत चार युवकांनी धाडसाने मदतकार्य केले आणि चौघांनाही सुखरूप पाण्याबाहेर काढले. युवकांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली.
अशी घडली थरारक घटना
मिळालेल्या माहितीनुसार, डाभुर्णी येथील खुशी लखन परदेशी ही पाहुणी म्हणून सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथे आली होती. खुशी परदेशी, अचल संजय कवाल आणि तिचा चुलत भाऊ अमोल रूमसिंग कवाल हे गोगडी धरण परिसरातील शेतात गेले होते. शेताच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी त्यांनी बोटचालक आनंदा काशिनाथ भिल यांच्या प्लास्टिकच्या बोटीचा आधार घेतला.
बोट धरणाच्या मध्यभागी पोहोचताच अचानक तिचा तोल जाऊन बोट उलटली. त्यामुळे बोटीतील चौघेही पाण्यात पडले. मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी उलटलेल्या बोटीला घट्ट पकडून ठेवले आणि मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. आवाज ऐकून परिसरातील शेतकरी धरणाच्या दिशेने धावले.
चार युवकांचे धाडस ठरले जीवदान
घटनेची माहिती मिळताच पहूर पेठचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. यावेळी चार युवकांनी पाण्यातील ट्यूब आणि आपत्ती व्यवस्थापनाचे जॅकेट यांच्या मदतीने उलटलेल्या बोटीपर्यंत पोहोचत पाण्यात अडकलेल्या चौघांना सुरक्षित बाहेर काढले.
तासभर मृत्यूशी झुंज, अखेर चौघांची सुखरूप सुटका!
तब्बल एक तास चौघांचा जीव वाचविण्यासाठी संघर्ष सुरू होता. प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी जीवघेणा ठरत असताना चार युवक मदतीला धावून आले. त्यांच्या धाडसामुळे चौघांनाही जीवदान मिळाले. घटनेनंतर उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दरम्यान, नायब तहसीलदार नानासाहेब आगळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. संकटाच्या प्रसंगी धावून आलेल्या चार युवकांच्या धाडसाचे परिसरातून कौतुक होत आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

