भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

बोगस शिक्षक भरती घोटाळा ; तराळ विद्यालयाचा कागदावर शिपाई, मात्र प्रत्यक्षात अघोषित मालक असलेल्या अमोल कुळकर्णीला चारचाकी सह इंदुरहून अटक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज || बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला वेग आला असून, मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील मिठाराम फकीरा तराळ विद्यालयाचा शिपाई अमोल रमेश कुळकर्णी ऊर्फ शंभू याला नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने १६ ऑक्टोबर रोजी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तपास यंत्रणांनी त्याचा शोध सुरू केला होता. अखेर इंदूर महामार्गावर सापळा रचून त्याला मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून संशयास्पद आर्थिक व्यवहारांतून खरेदी केल्याचा संशय असलेली चारचाकी गाडीदेखील जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील मिठाराम फकीरा तराळ विद्यालय आणि मंगू रामजी महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये २०१४ ते २०१७ या कालावधीत कागदोपत्री बेकायदेशीर नियुक्त्या दाखवून शासनाची दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केली.
या प्रकरणाचा तपास नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून, अमोल कुळकर्णीच्या अटकेमुळे कथित आर्थिक व्यवहार आणि नियुक्त्यांशी संबंधित कागदपत्रांची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.

कागदावर शिपाई, संस्थेच्या कारभारात महत्त्वाची भूमिका?

अमोल कुळकर्णी हा कागदोपत्री शिपाई पदावर कार्यरत असला, तरी संस्थेच्या प्रशासकीय कामकाजात आणि आर्थिक व्यवहारांत त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जाते. तो संस्थाध्यक्ष विनोद तराळ यांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा होती. संस्थेतील प्रशासकीय सूत्रे आणि आर्थिक देवाणघेवाण यांवर त्याचा प्रभाव असल्याचेही वृत्त आहे.

शाळेतील मुख्याध्यापकांशी अरेरावीने वागत असल्याच्या तक्रारींमुळे शिक्षक वर्गात नाराजीचे वातावरण असल्याचे सांगितले जाते. मात्र, या संदर्भातील आरोपांची तपासातून पडताळणी होणे आवश्यक आहे.

वाहन जप्त; आर्थिक व्यवहारांची चौकशी

मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने अमोल कुळकर्णीचा शोध घेऊन त्याला अटक केली. तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या चारचाकी वाहनाच्या खरेदीसाठी वापरण्यात आलेल्या पैशांचा स्रोत आणि संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

इतर संशयितांच्या भूमिकेकडे लक्ष

या प्रकरणात कथित बेकायदेशीर नियुक्त्या कशा करण्यात आल्या, शासनाच्या निधीचा गैरवापर कशा प्रकारे झाला आणि त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, हे तपासातून स्पष्ट होणार आहे. संबंधित नियुक्त्यांची कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि संस्थेच्या कारभारातील विविध व्यक्तींची भूमिका यांची पडताळणी तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

अमोल कुळकर्णीला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याने चौकशीत कोणती माहिती समोर येते आणि या घोटाळ्यातील इतर संशयितांबाबत तपास यंत्रणा कोणती पावले उचलतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!