यावल पालिकेत काँग्रेसला धक्का! तीन अपत्य प्रकरणी नगरसेवक शेख निसार अपात्र
यावल.मंडे टु मंडे न्युज || तीन अपत्यांच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निर्णय देताना यावल नगरपरिषदेतील काँग्रेसचे नगरसेवक शेख निसार हमीद यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी नगरपालिका प्रशासनाच्या सहआयुक्तांनी हा निर्णय दिला. या निकालामुळे यावल नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी काळात पालिकेतील सत्तासमीकरणांवर त्याचा काय परिणाम होणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
चौथ्या अपत्याच्या जन्माचा मुद्दा ठरला निर्णायक
यावल नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ५-अ मधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले नगरसेवक शेख निसार हमीद यांच्याविरोधात उमेश रेवा फेगडे यांनी तीन अपत्यांच्या मुद्द्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात याचिका दाखल केली होती.
याचिकाकर्त्यांनी शेख निसार यांना चार अपत्ये असल्याचा दावा केला. त्यापैकी अन्सार अहमद यांचा जन्म ६ जून २००३ रोजी झाल्याचे पुराव्यांसह नमूद करण्यात आले. मात्र, उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात १२ सप्टेंबर २००१ नंतर एकही अपत्य जन्माला आले नसल्याचे नमूद केल्याचा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला होता.
सुनावणीनंतर अपात्रतेचा निर्णय
या प्रकरणात ४ ऑगस्ट, १८ ऑगस्ट आणि १८ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली. सुनावणीदरम्यान उपलब्ध पुराव्यांच्या आधारे शेख निसार यांच्या चौथ्या अपत्याचा जन्म २००३ मध्ये झाल्याचे सिद्ध झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले.
त्यानुसार, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम, १९६५ मधील कलम १६(१)(के) अन्वये शेख निसार हमीद यांना नगरसेवक पदासाठी अपात्र घोषित करण्यात आले. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त जनार्दन पवार यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला.
अपील करण्याची नगरसेवकांची भूमिका
या निर्णयानंतर शेख निसार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निकालाविरोधात अपील दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे कोणती कायदेशीर घडामोड घडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पोटनिवडणुकीच्या शक्यतेने राजकीय हालचालींना वेग
प्रभाग क्रमांक ५ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. आता या प्रभागात पोटनिवडणूक होण्याची वेळ आल्यास मतदार पुन्हा काँग्रेसला संधी देणार की अन्य पक्ष बाजी मारणार, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह भाजप आणि महायुतीतील घटक पक्षांकडूनही संभाव्य राजकीय परिस्थितीचा विचार करून रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. मात्र, पुढील राजकीय चित्र स्पष्ट होण्यासाठी अपील प्रक्रियेतील घडामोडी आणि निवडणुकीबाबतचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

