सावदा पोलिसांची धडक कारवाई; गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक करणारे वाहन जप्त, दोन जिवंत गोवंशाची सुटका
सावदा. ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज | सावदा शहरात गोवंशाची कत्तल करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर व निर्दयतेने वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सावदा पोलिसांनी रविवारी रात्री धडक कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून दोन गोवंश जिवंत सुटका करण्यात आली. पोलिसांनी गोवंश वाहतुकीसाठी वापरलेले वाहनही जप्त केले आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ३ लाख ३० हजार रुपये आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सावदा शहरातील ख्वाजा नगरसमोरील मरिमाता मंदिराजवळून गोवंशाची कत्तल करण्याच्या उद्देशाने एका वाहनातून बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी रात्री सुमारे १०.५० वाजता घटनास्थळी धाव घेतली.
ख्वाजा नगरकडून येणाऱ्या एका पिवळ्या रंगाच्या टाटा एस (छोटा हत्ती) वाहनाची पोलिसांनी तपासणी केली. वाहनाच्या मागील बाजूस असलेल्या बॉडीमध्ये दोन गोवंश अत्यंत निर्दयतेने, हालचालीसाठी पुरेशी जागा न ठेवता बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.
या कारवाईत पोलिसांनी अदनान शेख शगीर कुरेशी (वय १९, रा. इस्लामपुरा, खाटकीवाडा, सावदा, ता. रावेर) आणि निलेश रमेश पाटील (वय ४४, रा. प्लॉट भागात, टेलिफोन एक्सचेंजजवळ, सावदा, ता. रावेर) यांना ताब्यात घेतले.
जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे १५ हजार रुपये किमतीची एक तांबड्या रंगाची गाय आणि सुमारे १५ हजार रुपये किमतीचा एक पांढऱ्या रंगाचा गोऱ्हा यांचा समावेश आहे. तसेच सुमारे ३ लाख रुपये किमतीचे टाटा एस वाहन (क्र. MH.48.AG.5804) पोलिसांनी जप्त केले.


