कन्नड घाटात ५९ प्रवासी असलेल्या एसटी बसचा भीषण अपघात; प्रवाशांचा थरकाप
जळगाव.मंडे टु मंडे न्युज | जळगाव जिल्ह्यातील कन्नड घाटात रविवारी दुपारी एसटी बसचा भीषण अपघात झाला. छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जाणाऱ्या या बसमध्ये तब्बल ५९ प्रवासी होते. प्रवासादरम्यान बसच्या स्टीअरिंग रॉडमध्ये अचानक बिघाड झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस घाटातील संरक्षक कठड्यावर जाऊन आदळली.
या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने बस संरक्षक कठड्याला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा बस खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती.
अपघातानंतर प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. काही प्रवासी खिडक्यांमधून बाहेर पडताना दिसून आले. सर्व प्रवासी सुरक्षितपणे बाहेर आल्यानंतर त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
या अपघातात चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. अपघातामुळे काही काळ घाटातील वाहतुकीवरही परिणाम झाला होता. दरम्यान, बसच्या स्टीअरिंग यंत्रणेत नेमका कोणता बिघाड झाला, याची संबंधित विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे. स्टीअरिंग यंत्रणेतील बिघाडामुळे ५९ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कठड्यावर आदळली; संरक्षक कठड्यामुळे मोठा अनर्थ टळला.


