ब्रेकिंग : फूस लावून अल्पवयीन मुलीचे लग्न लावून विक्री, खचलेल्या पित्याची आत्महत्या
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रोजगार देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला नाशिकलाnनेऊन तिला अडीच लाख रुपये व दागिने घेऊन तिची विक्री करून तिचे जबरदस्तीने लग्न लावल्याचा धक्का दायक प्रकार उघडकीस आला. तसेच कोल्हापूर येथील आरोपींकडून जीवे मारण्याच्या धमक्या मुलीच्या पित्याला दिल्यामुळे या सर्व त्रासाला कंटाळून त्रस्त झालेल्या हरीविठ्ठल नगरातील पित्याने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज रविवारी २९ जून रोजी सकाळी ७ वाजता समोर आली. या घटनेने मुलीच्या अपहरणाचा, विक्रीचा आणि लग्नाचा धक्कादायक प्रकार समोर आला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील पीडित अल्पवयीन मुलीला काही महिलांनी रोजगाराचे खोटे आमिष दाखवून नाशिक येथे नेऊन तिला अडीच लाख रुपये आणि दागिने घेऊन कोल्हापूर येथील काही लोकांना विकून टाकले. इतकेच नव्हे तर, या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न ही लावून दिले.
दरम्यान,अल्पवयीन पीडित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती देखील राहिली. त्या नंतर तिचा गर्भपातही करण्यात आल्याचे सांगण्यात आले.अशा परिस्थितीत पीडित अल्पवयीन मुलगी सर्व प्रकाराला कंटाळून कशीतरी घरी पळून आली आणि तिने आपल्या कुटुंबियांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. पीडित मुलीचे कुटुंबीय गेल्या आठ दिवसांपासून रामानंदनगर पोलीस ठाण्यात तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नसल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
एकीकडे पोलिस तक्रार घेईनात तर दुसरीकडे फसवणूक करणाऱ्या दलालांना सोडून मुलीला विकत घेणारे आणि तिच्याशी लग्न करणारे कोल्हापूर येथील आठ ते दहा जण ‘मुलीला परत पाठवा, किंवा आमचे पैसे परत द्या’ अशी मागणी करत जीवे मारण्याच्या धमक्या देत होते.
मुलीसोबत घडलेला अमानुष प्रकार, त्यात आरोपींकडून येणाऱ्या धमक्या आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेतली जात नसल्याने या सर्व त्रासाला कंटाळून च मुलीच्या पित्याने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही पीडित अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे.

