मोठी बातमी : ९ पोलिसांना जन्मठेप! महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खळबळ,नेमकं काय आहे प्रकरण?
मंडे टु मंडे न्युज | सन २०११ मधील पोलीस कोठडीत झालेल्या अमानुष मारहाणीत संशयित आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी ऐतिहासिक निर्णय देत वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील तत्कालीन पोलीस निरीक्षकासह ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तब्बल १५ वर्षांनंतर (घटना २०११ मधील) वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला. या घटनेने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्ती: बैग्या नैनू पवार (रा. वाढोणा, ता. सेनगाव, जि. हिंगोली). ते पारधी समाजातील होते. ९ मे २०११ रोजी चोरीच्या संशयावरून रिसोड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर १० मे २०११ रोजी पोलीस कोठडीत अमानुष मारहाण झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. तब्बल १५ वर्षे १ महिना आणि २३ दिवस चाललेल्या खटल्यानंतर, २ जुलै रोजी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हे ऐतिहासिक व कठोर पाऊल उचलत ९ पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक माधव माणिक धांडे, पोलीस कर्मचारी मदन पवार, रमेश पवार, हिरालाल ताराम, शिवाजी खिल्लारी, अशोक वैद्य, वसंत जाधव, नागोराव खांडके, पंजाब पाटकर यांचा समावेश आहे.
या प्रकरणात कलम ३०२ अन्वये नऊ जणांना जन्मठेप, पुरावा नष्ट करण्यासाठी ७ वर्षे तर ‘अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यां’न्वये पाच वर्ष शिक्षा झाली आहे. या प्रकरणाचा तपास राज्य सीआयडीकडे सोपविण्यात आला होता. सीआयडीने ३४ दिवसांत तपास पूर्ण करून संबंधित पोलिसांविरुद्ध खुनासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील श्रीराम नारायणराव काळू यांनी युक्तिवाद केला. बेग्या पवार याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा सिद्ध झाला नसताना कबुली मिळविण्यासाठी त्याच्यावर अमानुष छळ करण्यात आला आणि कायद्याचा गैरवापर करण्यात आला, असा मुद्दा त्यांनी न्यायालयासमोर मांडला. पुरावे आणि साक्षींचा विचार करून न्यायालयाने आरोपींना भारतीय दंड संहितेतील खून, कबुलीजबाब मिळविण्यासाठी छळ करणे, गंभीर दुखापत करणे, समान उद्देशाने गुन्हा करणे आणि गुन्हेगारी कट रचणे यांसह विविध गंभीर कलमांखाली दोषी ठरविले.


