ब्रेकिंग : खदान मध्ये बुडून तीन अल्पवयीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव, मंडे टु मंडे न्युज | जळगाव जिल्ह्यातून एक मोठी दुर्दैवी घटना घडली. तीन अल्पवयीन तरुणांचा खादान मध्ये पडून मृत्यू झाला. अमळनेर शहरात आज मंगळवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे. चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ असलेल्या पाण्याने भरलेल्या खदाणीत बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला.
आज मंगळवार रोजी संध्याकाळी अमळनेर शहरातील चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ असलेल्या पाण्याने भरलेल्या खदान परिसरात मानव बंटी रतनानी, वय १४, कार्तिक विकी उधवानी, वय १४ आणि दिनेश विजय पंजवानी, वय १७ (राहणार संधी कॉलनी परिसर, अमळनेर ) हे तिघे तरुण गेले असता पाण्यातून चालत ते एका उंचवट्यावर पोहोचले. यावेळी सेल्फी काढताना एकाचा पाय घसरल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्याने हात दिला, तर दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिसराही खोल पाण्यात ओढला गेला. काही क्षणांत तिघेही सुमारे ३० फूट खोल पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नांनंतर देवळी येथील दीपक मोरे यांनी पाण्यात उतरून तिघांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत तिन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक दुर्दैवी घटनेने सिंधी कॉलनीसह संपूर्ण अमळनेर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


