ब्रेकिंग : सात हजारांची लाच भोवली… जळगाव जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता व स्थापत्य सहायक एसीबीच्या जाळ्यात
चाळीसगाव. मंडे टू मंडे न्यूज | जळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभाग, चाळीसगाव येथील उपविभागीय अभियंता यथार्थ पांडुरंग निनावे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक कुलदीप विरूचंद गमे यांना रस्त्याच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तक्रारदार यांच्या मित्राने मौजे दहिवद येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण व गावहाळाचे काम पूर्ण केले होते. या कामाचे १० लाख ४७ हजार ८४३ रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी मोजमाप पुस्तिकेत नोंद करून मूल्यांकन करणे आवश्यक होते. संबंधित फाईल पुढील मंजुरीसाठी उपविभागीय अभियंता यथार्थ निनावे यांच्याकडे पाठविण्यात आली होती.
३ जुलै २०२६ रोजी तक्रारदार यांनी निनावे यांची भेट घेतली असता, त्यांनी बिलाच्या एक टक्का प्रमाणे म्हणजे ७ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी ७ जुलै रोजी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी पंचांसमक्ष करण्यात आल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यावेळी उपविभागीय अभियंता निनावे यांनी लाचेची रक्कम त्यांचे सहायक कुलदीप गमे यांच्या मार्फत स्वीकारली. लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे व प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


