भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

ब्रेकिंग : जळगावात जिल्हा परिषदेचे दोन अधिकारी १० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात!

जळगाव. मंडे टु मंडे न्युज || जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील दोन अधिकाऱ्यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. उपविभागीय अधिकारी सतीष मनसुलाल शिसोदे आणि कनिष्ठ अभियंता भागवत वसंता चवरे अशी कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. रस्त्याच्या कामाचे बिल मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

नेमके प्रकरण काय?

या प्रकरणातील तक्रारदार हे ठेकेदार असून, त्यांनी धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे सन २०२५-२६ या वर्षात गावांतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण केले होते. या कामाची एकूण किंमत ९ लाख ९० हजार ७६३ रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पूर्ण केलेल्या कामाची मोजणी पुस्तिका (एमबी) आणि बिले तयार करण्यासाठी कनिष्ठ अभियंता भागवत चवरे यांनी यापूर्वी तक्रारदाराकडून २० हजार रुपये स्वीकारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, कामाची बिले मंजूर न झाल्याने तक्रारदार यांनी बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात जाऊन याबाबत विचारणा केली. त्यावेळी बिलांवर स्वाक्षरी करून ती पुढील मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविण्याच्या मोबदल्यात उपविभागीय अधिकारी सतीष शिसोदे यांच्यासाठी एकूण बिलाच्या १.५ टक्के दराने १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

पडताळणीनंतर लाचेची रक्कम १० हजारांवर

या मागणीबाबत तक्रारदाराने २ नोव्हेंबर २०२६ रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार त्याच दिवशी पंचांच्या उपस्थितीत बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान सुरुवातीला १५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे एसीबीच्या माहितीत नमूद आहे.

पंचांसमक्ष लाचेची रक्कम स्वीकारली

२ नोव्हेंबर रोजी बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात कनिष्ठ अभियंता भागवत चवरे यांनी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष १० हजार रुपये स्वीकारले आणि ही रक्कम उपविभागीय अधिकारी सतीष शिसोदे यांच्याकडे दिली. शिसोदे यांनीही ही रक्कम स्वीकारून स्वतःकडे ठेवल्याचे एसीबीने नमूद केले आहे. त्यानंतर संबंधित लाचेची रक्कम त्यांच्याकडून जप्त करण्यात आली.

अंगझडतीत रोख रकमेसह मोबाईल जप्त

कारवाईदरम्यान उपविभागीय अधिकारी सतीष शिसोदे यांच्या अंगझडतीत ॲपल कंपनीचा एक मोबाईल फोन आणि ९१ हजार ६२० रुपये रोख रक्कम मिळाली. तर कनिष्ठ अभियंता भागवत चवरे यांच्या अंगझडतीत विवो कंपनीचा एक मोबाईल फोन आणि २० हजार ६०० रुपये रोख रक्कम आढळून आली.

या प्रकरणी जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ आणि १२ अन्वये
१) श्री सतीष मनसुलाल शिसोदे वय ५५ वर्षे व्यवसाय नोकरी पद उपविभागीय अधिकारी जि.प. बांधकाम, उपविभाग जळगाव रा. आदर्श नगर जळगाव (विभाग – जि.प. जळगाव वर्ग-१)
२) श्री भागवत वसंता चवरे वय ३२ वर्ष व्यवसाय नोकरी पद कनिष्ठ अभियंता जि.प. बांधकाम उपविभाग, जळगाव (विभाग- जि.प. जळगाव वर्ग-३) यांचेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले.

कारवाई: श्रीमती रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार (कॅम्प जळगाव).

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!