भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

शाळेच्या दारात पोहोचले न्यायालय! विद्यार्थ्यांना मिळाले कायद्याच्या संरक्षणाचे बळ,म्युनिसिपल हायस्कूलमध्ये ‘सुरक्षित बचपन अभियान’ उत्साहात संपन्न

भुसावळ.मंडे टु मंडे न्युज || बालकांचे बालपण सुरक्षित, निर्भय आणि शोषणमुक्त करण्यासाठी न्यायालयाने थेट शाळेच्या प्रांगणात धाव घेत विद्यार्थ्यांना कायद्याच्या संरक्षणाची जाणीव करून दिली. भुसावळ तालुका विधी सेवा समिती व भुसावळ वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘सुरक्षित बचपन अभियान’ या जनजागृती सप्ताहाचा कार्यक्रम नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना कायदेशीर हक्कांची माहिती देण्यासोबतच अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठविण्याचा महत्त्वपूर्ण संदेश यावेळी देण्यात आला.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तसेच मे. दिवाणी व फौजदारी न्यायालय, भुसावळ यांच्या आदेशान्वये २६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हे अभियान राबविण्यात आले.


कायद्याची माहिती आता विद्यार्थ्यांच्या दारी!
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश श्री. व्ही. डी. घागी उपस्थित होते. यावेळी ॲड. पुरुषोत्तम पाटील, श्री. श्याम शिंदे, श्रीमती रूपाली नेवे यांच्यासह न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक वसंत पी. सुलताने, सेवा ज्येष्ठ शिक्षक डॉ. प्रदीप साखरे, एन. एच. राठोड, एस. टी. चौधरी, डी. के. भंगाळे, नाना पाटील, मनोज किरंगे, निलेश बोराडे, अरुण नेटके, शालिनी बनसोडे, संध्या धांडे, ज्योती शिरतुरे, रेखा सोनवणे, वरिष्ठ लिपिक प्रवीण चौधरी, शिपाई राजेंद्र बागुल, रोहन पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पॉक्सो कायद्यापासून सायबर सुरक्षेपर्यंत मार्गदर्शन
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पॉक्सो कायदा २०१२, सायबर सुरक्षा, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि बालकामगार प्रतिबंधक कायद्यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. मोबाईल व इंटरनेटचा सुरक्षित वापर, सोशल मीडियावरील संभाव्य धोके, अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळणे आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
बालकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय, अत्याचार किंवा शोषण झाल्यास घाबरून न जाता पालक, शिक्षक अथवा संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी आणि कायदेशीर मदत घ्यावी, असे आवाहन मान्यवरांनी केले. ‘बोलो, बताओ, बचाओ’ या संदेशातून विद्यार्थ्यांना अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे धैर्य देण्यात आले. विषयाची अधिक प्रभावी जाणीव व्हावी यासाठी दूरचित्रवाणीवर माहितीपटही दाखविण्यात आला.


मान्यवरांचा सत्कार; शिक्षकांचे मोलाचे योगदान
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक वसंत पी. सुलताने, सेवा ज्येष्ठ शिक्षक डॉ. प्रदीप साखरे व शिक्षिका शालिनी बनसोडे यांच्या हस्ते उपस्थित न्यायाधीश व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एन. एच. राठोड यांनी केले.
बालकांचे संरक्षण ही केवळ पालकांची किंवा शाळेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश या अभियानातून देण्यात आला. न्यायालयीन यंत्रणेने शाळेपर्यंत पोहोचून विद्यार्थ्यांना कायद्याचे कवच, सुरक्षिततेचा विश्वास आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले. त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल व सुरक्षित भविष्यासाठी निश्चितच दिशादर्शक ठरणार असून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून त्याचे कौतुक होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!