साक्ष देण्याच्या वादातून रक्तरंजित थरार! वाळूच्या डंपरखाली चिरडून एकाची हत्या; जिल्ह्यात खळबळ
जळगाव. मंडे टु मंडे न्युज || साक्ष देण्याच्या वादातून एका व्यक्तीला वाळूच्या डंपरखाली चिरडून ठार मारल्याची धक्कादायक घटना ३१ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ९:४५ वाजता अमळनेर तालुक्यातील नांद्री गावाच्या बसस्थानकासमोर घडली. शरद रतन पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जुन्या मारहाणीच्या प्रकरणात विरोधात साक्ष देणार असल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, डंपर चालकाला पोलिसांनी रात्रीच अटक केली.
जुन्या वादातून धमकी दिल्याचा आरोप
याप्रकरणी नगाव बुद्रुक येथील ज्ञानेश्वर काळूगिर गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ते आपल्या अंगणात मोटारसायकल लावत असताना विपुल किरण गोसावी, सागर संजय गोसावी आणि मयूर अनिल बोरसे हे वाळूचे ट्रॅक्टर खाली करण्यासाठी आले होते. यावेळी ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने ज्ञानेश्वर गोसावी यांनी जाब विचारला. त्यातून वाद होऊन विपुल, सागर, संजयगिर गोसावी आणि मयूर यांनी ज्ञानेश्वर गोसावी व त्यांच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी तलाठी महेंद्र पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यावेळी शरद रतन पाटील हे साक्षीदार होते.
याच साक्षीवरून विपुल गोसावी याने शरद पाटील यांना धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विरोधात साक्ष दिल्यास रस्त्यावर भेटल्यावर चिरडून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. मात्र, त्यावेळी ग्रामस्थांनी समजूत घातल्याने शरद पाटील यांनी पोलिसांत तक्रार केली नव्हती.
नांद्री बसस्थानकाजवळ नेमके काय घडले?
३१ ऑक्टोबर रोजी रात्री पोलीस पाटील प्रवीण गोसावी यांचा वाढदिवस असल्याने शरद पाटील यांच्यासह काही जण सावखेडा येथील देव हॉटेलमध्ये जेवणासाठी जात होते. रात्री ९:४५ वाजण्याच्या सुमारास नांद्री बसस्थानकाजवळ पातोंडा गावाच्या दिशेने आलेल्या राखाडी रंगाच्या मारुती कारने महेश आत्माराम पाटील यांना कट मारला आणि कार पुढे गेली.
काही अंतरावर कार थांबल्यानंतर त्यातून विपुल गोसावी, मयूर बोरसे आणि सागर गोसावी उतरले. त्याचवेळी पातोंडाकडून आलेल्या एचआर ३७ डी ८९५७ क्रमांकाच्या डंपरचा चालक भरत सुभाष पाटील खाली उतरून शिवीगाळ करू लागल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यावेळी प्रवीण गोसावी यांनी, ”तुम्ही माणसे मारायला निघाला आहात का?” असा जाब विचारला. त्यानंतर विपुल गोसावी याने डंपर चालक भरत पाटील याला संबंधितांना चिरडून टाकण्यास सांगितल्याचा आरोप आहे.
शरद पाटील यांना डंपरसमोर ढकलल्याचा आरोप
फिर्यादीनुसार, डंपर चालकाने वाहन वेगाने संबंधितांच्या अंगावर घातले. यावेळी विपुल गोसावी आणि मयूर बोरसे यांनी शरद रतन पाटील यांना डंपरसमोर ढकलल्याचा आरोप आहे. सागर गोसावी याने चंद्रशेखर पाटील यांनाही ढकलण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
डंपर शरद पाटील यांच्या अंगावरून गेल्याने त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर संबंधित आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
धुळे येथे नेताना मृत्यू; आमदारांची मदत
गंभीर जखमी शरद पाटील यांना १०८ रुग्णवाहिकेने अमळनेर येथील नर्मदा फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी धुळे येथे हलविण्यात येत होते. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच आमदार अनिल पाटील यांनी रात्री रुग्णालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली आणि उपचारांसाठी ५० हजार रुपयांची मदत केली. उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे आणि डीवायएसपी विनायक कोते यांनीही घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांची यंत्रणा सक्रिय; डंपर चालकाला अटक
आमदार अनिल पाटील यांनी पोलीस अधीक्षकांशी चर्चा केल्यानंतर पोलिसांची यंत्रणा सक्रिय झाली. घटनानंतर दहिवद फाटा आणि पिंपळी मार्गे पळून गेलेला डंपर बुधगाव येथे पकडण्यात आला. डंपर चालक भरत सुभाष पाटील याला पोलिसांनी रात्रीच अटक केली.
या घटनेतील इतर संबंधितांचा सहभाग, तसेच गुन्ह्याची पार्श्वभूमी याबाबत पोलिसांचा पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे. साक्ष देण्याच्या वादातून झालेल्या या कथित हत्येमुळे अमळनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

