ब्रेकिंग : यावल तालुका गोळीबाराने हादरला.. ! ४० वर्षीय व्यक्तीवर धडाधड…झाडल्या गोळ्या..
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | गुरुवार दिनांक १० जुलै रोजी रात्री सुमारे ९.३० वाजेच्या दरम्यान यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळ असलेल्या आडगाव मनुदेवी फाट्यावर रायबा हॉटेलमध्ये हॉटेल मालक प्रमोद श्रीराम बाविस्कर. वय ४० वर्षे .यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली. बाविस्कर यांच्या छातीत आणि हातावर गोळ्या झाडण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.या घटनेने यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार १० जुलै रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास काही अज्ञात व्यक्ती यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळ असलेल्या आडगाव मनुदेवी फाट्यावर रायबा हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात आणि हॉटेल मालक प्रमोद बाविस्कर यांच्या सोबत वाद झाला. वाद वाढल्याने त्या नंतर थेट अज्ञात व्यक्तींकडून हॉटेल मालकावर गोळीबार करण्यात आला. गोळीबार करून गोळीबार करणारे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
दरम्यान, घटनेनंतर तातडीने त्यांना जळगाव येथील खाजगी आरोशी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस हवालदार वासुदेव मराठे, संदीप सूर्यवंशी, मुकेश पाटील, किशोर परदेशी यांच्यासह पोलीस पथक रात्री साडेदहा वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून तपासाची दिशा ठरवली असून घटनास्थळी निकामे काडतूस मिळाले असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली. गोळीबार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून लवकरच आरोपींचा छडा लागेल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला.

