नोकरीच्या आमिषाने पैसे घेतल्याच्या तक्रारी ; मंत्री महाजनांचा अल्टिमेटम उद्या पर्यंत पैसे परत करा, अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा
जामनेर.मंडे टु मंडे न्युज | ग्रामसेवक, तलाठी यांसह विविध शासकीय पदांवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेक तरुणांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. माझ्या जवळचे नातेवाईक किंवा पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे सांगून कुणी पैसे घेतले असतील, तर त्यांनी सोमवार (दि. १७ ऑगस्ट)पर्यंत संबंधितांचे पैसे परत करावेत. अन्यथा त्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास सांगण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला.
जामनेर येथे पत्रकारांशी संवाद साधताना महाजन यांनी या प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली. काही दूरचे नातेवाईक तसेच पक्षातील कार्यकर्त्यांनी ‘आम्ही मंत्री गिरीश महाजन यांच्या जवळचे आहोत’ असे सांगून ग्रामसेवक, तलाठी यांसह शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुणांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात जामनेरातील काही कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर नोकरभरतीच्या नावाखाली झालेल्या कथित फसवणुकीचे प्रकारही समोर येऊ लागले आहेत. अनेक नागरिकांनी नोकरीसाठी पैसे दिल्याच्या तक्रारी केल्याने महाजन यांनी संबंधितांना थेट इशारा दिला आहे. मात्र, पैसे नेमके कुणी घेतले, याबाबतची नावे जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला.
बोगस वर्क ऑर्डर प्रकरणानंतर अनेक तरुणांनी नोकरीच्या आशेने पैसे दिले; मात्र अनेक वर्षे उलटूनही नोकरी मिळाली नसल्याचे तक्रारींतून समोर आले आहे. या प्रकरणातील काही व्यक्ती मंत्री महाजन यांच्या परिचयातील किंवा गोतावळ्यातील असल्याने तक्रारदार पुढे येण्यास धजावत नव्हते, अशी चर्चा आहे.
अनेक युवक आपल्या जमिनी गहाण ठेवून नोकरीवर अन्य कामांसाठी या एजंटना पैसे देत आले आहेत. यातील बहुतेक युवकांची फसवणूक झाली आहे. त्यांना नोकरी आणि ज्या कामासाठी पैसे दिले त्यापैकी काहीही हाती लागले नाही. आपले पैसेही परत मिळालेले नाहीत
दरम्यान, या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून तनय महाजन यांचे नावही चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या संदर्भातील आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.


