भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जळगाव जिल्ह्यातील दोन तरुणींसह एका तरुणाचे अपहरण,परिसरात खळबळ

जळगाव. मंडे टु मंडे न्युज || वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणी आणि एका तरुणाच्या अपहरणाच्या तीन स्वतंत्र घटना अमळनेर शहरातून समोर आल्या आहेत. या प्रकरणांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित नातेवाईकांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) अन्वये अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिरूड नाका परिसरातील घटना :
शिरूड नाका परिसरातील १८ वर्षीय तरुणी २८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान प्रताप महाविद्यालयात गेली होती. मात्र, ती घरी परतली नाही. शिरूड नाका येथील ओंकार नगर परिसरातील रोहित क्रितेश सोनवणे याने फूस लावून तिला महाविद्यालयातून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या आईने दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहित सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.

कचेरीमागील परिसरातील घटना :
दुसऱ्या घटनेत २१ वर्षीय तरुणीला २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान तिच्या राहत्या घरातून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईने केली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.

पैलाड येथील तरुणाचे अपहरण :
तिसरी घटना पैलाड भागातील साई गजानन नगर येथे घडली. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता कनराज रमेश पारधी (वय ३५) याला त्याच्या राहत्या घरातून कोणीतरी गैरपद्धतीने अपहरण करून नेल्याची फिर्याद त्याचा भाऊ योगीराज पारधी यांनी दिली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसांनी कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल केला असून, तपास उदय बोरे करीत आहेत.

तीनही प्रकरणांचा तपास सुरू :
शिरूड नाका, कचेरीमागील परिसर आणि पैलाड येथील साई गजानन नगर या तीन वेगवेगळ्या भागांत या घटना घडल्या आहेत. तीनही प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासह पुढील तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!