पाडळसे येथे ग्रामसुरक्षा दलाची स्थापना; गुन्हेगारी नियंत्रणासाठी फैजपूर पोलिसांचा पुढाकार
पाडळसे. ता. यावल.मंडे टु मंडे न्युज || वाढत्या चोऱ्या, अवैध धंदे आणि गावातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या घटकांना आळा घालण्यासाठी फैजपूर पोलीस स्टेशनच्या वतीने पाडळसे येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ग्रामस्थांच्या सहकार्याने ‘ग्रामसुरक्षा दला’ची स्थापना करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) संदीप पाटील होते.
पाडळसे येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडलेल्या या बैठकीस गावातील पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, सहाय्यक फौजदार मोती पवार ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील तरुण व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांचा सहभाग हीच खरी ताकद – सपोनि संदीप पाटील
यावेळी मार्गदर्शन करताना सपोनि संदीप पाटील म्हणाले की, “पोलीस आणि जनता यांच्यातील समन्वय चांगला राहिल्यास गुन्हेगारीला वेसण घालणे सोपे जाते. गावातील शांतता टिकवणे ही केवळ पोलिसांचीच नाही, तर प्रत्येक सुजाण नागरिकाचीही जबाबदारी आहे. रात्रीच्या वेळी गावात अनोळखी संशयित इसम दिसल्यास किंवा काही अनुचित प्रकार घडताना आढळल्यास ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी सतर्क राहून तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. कायद्याचे पालन करून गावाचे रक्षण करण्यात ग्रामसुरक्षा दल मोलाची भूमिका बजावेल.”
ग्रामसुरक्षा दलाचे स्वरूप व कार्य:
- बैठकीदरम्यान गावातील धाडसी आणि सामाजिक जाणीव असलेल्या तरुणांची निवड करून ग्रामसुरक्षा दल गठीत करण्यात आले.
- हे दल गावातील महत्त्वाचे रस्ते, वेशी आणि शेतशिवारात रात्रीच्या वेळी गस्त घालणार आहे.
- शेतीपंपांच्या वायर्स, जनावरांची चोरी आणि घरफोड्या रोखण्यावर या दलाचा विशेष भर असेल.
- गावात अवैध दारूविक्री, जुगार किंवा इतर गैरप्रकार सुरू असल्यास त्याची गोपनीय माहिती पोलिसांना देण्याची जबाबदारी या सदस्यांवर सोपवण्यात आली.
बैठकीच्या शेवटी उपस्थित ग्रामस्थांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले आणि गावाला सुरक्षित व शांत ठेवण्यासाठी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीचे सूत्रसंचालन आणि आभार विजय कोळी सर यांनी मानले.


