अत्याचाराचा आरोप असलेले गुन्हे शाखेचे पी आय संदीप पाटील अखेर निलंबित
जळगाव, मंडे टु मंडे न्युज |महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शुक्रवारी याबाबत आदेश जारी केले.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी आमदार मंगेश चव्हाण यांनी संदीप पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
२९ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी या घटनेबाबत आवाज उठवत संदीप पाटील यांच्यावर महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपामुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली होती.
फिर्याद देण्यासाठी आलेली महिला तात्पुरती परत गेल्याने गुन्हा अधिकृतरीत्या नोंदवला जाऊ शकला नव्हता. मात्र या संपूर्ण घटनेबाबतचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी नैतिकतेला बाधा आणणारे कृत्य झाल्याचे नमूद करून विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे सादर केला होता.
या अहवालाच्या आधारे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी तत्काळ कारवाई करत पीआय संदीप पाटील यांचे निलंबन आदेश शुक्रवारी काढले. दरम्यान, या प्रकरणाची प्राथमिक चौकशी अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्यामार्फत केली जाणार असल्याचे कराळे यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणामुळे जिल्ह्यात तसेच पोलिस विभागात मोठी चर्चा रंगली आहे. पोलिसांवर असलेला जनतेचा विश्वास अबाधित राहावा यासाठी अशा आरोपांवर कठोर कारवाई केली जाणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे

