“बुकिंग नंतरही सिलेंडर गायब; कौशिकी भारत गॅस एजन्सीच्या कारभारा विरोधात ग्राहक संतप्त”
नशिराबाद/जळगाव, डॉ.दीपक लोखंडे | जळगाव येथील कालिंका माता परिसरातील कौशिकी भारत गॅस एजन्सीकडून घरगुती गॅस सिलेंडरचा नियमित व वेळेवर पुरवठा होत नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिलेंडर बुकिंग करूनही वेळेत डिलिव्हरी मिळत नसल्याने ग्राहकांना एजन्सी व गोडाऊनच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याची तक्रार समोर आली आहे.
ग्राहक रमेश टी. चव्हाण, इमरान खान गुलशेर खान, इकबाल इब्राहिम पठाण, बोलके गोपाळ जी, बंगाली सोपान चिंधू यांच्यासह सुमारे १० ते १२ ग्राहकांनी एजन्सीच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे. संबंधित ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मे रोजी मोबाईलवर सिलेंडर डिलिव्हरीचा संदेश प्राप्त झाला होता. मात्र प्रत्यक्षात गोडाऊनवर सिलेंडर घेण्यासाठी गेल्यानंतर “तुमचे नाव यादीत नाही” असे सांगत ग्राहकांना रिकाम्या हाताने परत पाठविण्यात आले.
या प्रकारामुळे ग्राहकांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत असून वेळेचाही मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. नियमित गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक कुटुंबांचे दैनंदिन व्यवहार अडचणीत आले आहेत. एजन्सीच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
दरम्यान, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तक्रारींचे तात्काळ निवारण करावे, तसेच पुरवठा विभागाने चौकशी करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

