“३५ ते ४० तक्रारींनंतरही महापालिका झोपेत; गोलाणी मार्केटच्या A wing तसेच अनेक ठिकाणी बेसमेंट मध्ये घाण पाण्याचे साम्राज्य”
जळगाव/नशिराबाद, डॉ. दीपक लोखंडे | जळगाव शहरातील व. वा. म्युनिसिपल मार्केट (गोलाणी मार्केट) येथील बेसमेंटमध्ये ड्रेनेज व चेंबरची नियमित सफाई न झाल्यामुळे घाण पाणी साचून अत्यंत गंभीर आरोग्यविषयक परिस्थिती निर्माण झाली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित दुकानदारांनी महापालिकेकडे तब्बल ३५ ते ४० वेळा तक्रार अर्ज करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दुकानदारांनी महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मार्केटमागील बाजूस असलेल्या चेंबर व विंगमधील ड्रेनेज लाईनची अनेक वर्षांपासून सफाई करण्यात आलेली नाही. ड्रेनेज पाइप कमी व्यासाचे असल्याने संडास व बाथरूमचे घाण पाणी थेट बेसमेंटमध्ये साचत आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
विशेष म्हणजे, बेसमेंटमध्ये साचलेले हे घाण पाणी मागील तीन ते चार वर्षांपासून कायम असल्याचा गंभीर आरोप दुकानदारांनी केला आहे. अनेक दुकानदारांच्या मते, या अस्वच्छतेमुळे व्यवसायावर परिणाम होत असून ग्राहकही परिसर टाळत आहेत. काही बाथरूम बंद करण्याची वेळदेखील आली आहे.
तक्रारदारांनी महापालिका प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत, जळगाव महापौर दीपमाला काळे तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. “आरोग्याच्या दृष्टीने ही अत्यंत धोकादायक परिस्थिती असून भविष्यात कोणत्याही नागरिकाच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी महापालिका जबाबदार राहील,” असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे जळगाव महापालिकेच्या या स्वच्छता व नागरी सुविधांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महापौर सौ. दीपमाला काळे यांनी जशी पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करून स्वतः पाण्याच्या टाकीत उतरून पाहणी केली आणि अंमलबजावणी करून घेतली त्याच प्रमाणे त्यांनी गोलाणी मर्केट परिसरात येऊन या घाण पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अशी तीव्र मागणी होत आहे.
