हॉस्पिटल उभारण्यासाठी ५० लाखांची मागणी ; डॉक्टर विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी भुसावळातील पतीसह सात जणांवर गुन्हा
भुसावळ.मंडे टु मंडे न्युज || राजस्थानमधील जयपूर येथे मोठे हॉस्पिटल उभारण्यासाठी माहेरून ५० लाख रुपये आणण्याचा तगादा लावत विवाहित डॉक्टरचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा प्रकार भुसावळात समोर आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत डॉ. नयना सौरभ प्रजापत (वय ३२, रा. गोविंद कॉलनी, अयोध्या नगर, भुसावळ) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. तक्रारीनुसार, २७ नोव्हेंबर २०२३ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत पतीसह सासरच्या मंडळींकडून जयपूर येथे मोठे हॉस्पिटल बांधण्यासाठी माहेरून ५० लाख रुपये आणावेत, अशी मागणी करण्यात येत होती.

ही रक्कम आणण्यासाठी वारंवार दबाव टाकत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. तसेच वेळोवेळी मारहाण करून, पैसे आणल्याशिवाय तुला नांदवण्यासाठी घेऊन जाणार नाही, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी डॉ. सौरभ प्रजापत (वय ३१), प्रभूराम प्रजापत (वय ६२), संतोष प्रजापत (वय ५८), डॉ. नितीन प्रजापत (वय ३३), रामजी प्रजापत (वय ५६), कांचन प्रजापत (वय ४८, सर्व रा. भुसावळ) आणि डॉ. स्वाती प्रजापत (वय ३६, रा. उदयपूर, राजस्थान) अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तेजस पारीस्कर करीत आहेत.






