फैजपूर येथील बोकड बाजार पाडळसा येथे भरवण्याचा निर्णय फसला? वाहन धारकांचा संताप अनावर
फैजपूर, ता.यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | बकरा ईद च्या पार्श्वभूमीवर फैजपूर येथे भरणारा बोकड बाजार बाजार समिती संचालक मंडळांनी ऐन वेळेवर निर्णय बदलल्याने तो पाडळसा येथे भरवला मात्र या ठिकाणी सोयी सुविधा नसल्याने परप्रांतातून आलेल्या बोकड व्यापाऱ्यांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी जागा नसल्याने गाड्या महामार्गाच्या लगत उभ्या केल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली या ठिकाणी सुमारे दोन्ही बाजूने एक एक किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या यात मोटरसायकलीचे प्रमाण फार मोठे होते.
रस्त्यावरच प्रचंड गर्दी असल्याने हा भुसावळ जळगाव कडे जाणारा एकच मुख्य रस्ता असल्याने वाहन धारकांना
रस्त्यावर दीड ते दोन दोन तास खोळंबून रहावे लागले. याचा वाहन धारकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागला. बाजार समिती संचालक मंडळाने कोणतीही खातरजमा न करता सदर ठिकाणी बाजार भरवल्याने त्यांचा हा निर्णय फसला असल्याचे बोलले जाते. मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणावर बोकळ विक्रीसाठी आल्याने फैजपूर येथे भर रस्त्यावर बोकड उभे केल्याने प्रचंड वाहतूक थांबली होती. त्यामुळे यावेळी हा बाजार पाडळसा येथे भरवण्याचा निर्णय घेतला मात्र हे ठिकाण बोकड बाजारासाठी योग्य व सोयीचे नसल्याने परप्रांतीय व्यापारांसोबत मध्य प्रदेश येथून विक्रीसाठी येणारे व्यापारांची एकच गोची झाली.
लाखो बोकडांची आवक झाल्याने कोट्यावधीची उलाढाल झाली साधारणपणे एका बोकडाची किंमत ही १५ हजारापासून पासून ते १ लाखापर्यंत होती. परप्रांतातून आलेल्या व्यापाऱ्यांची इतर मूलभूत सोयी सुविधा नसल्याने कुचंबना झाली.
नियोजन शून्य निर्णयामुळे अत्यंत महत्त्वाच्या या बोकड बाजाराच्या ठिकाणी प्रचंड वर्दळ व वाहतुकीच्या कोंडीमुळे पायी चालायलाही रस्ता राहिलेला नाही अशी परिस्थिती होती. स्थानिक व्यापारी व शेळी मेंढी विक्री धारक यांना विचारात न घेता व कोणतीही सर्व समावेशक चर्चा न करता परस्पर घेतलेला हा निर्णय अंगलट आल्याचे प्रथम दर्शनी दिसते.
.खरेदी विक्रीच्या व्यवहारातून लाखोचे उत्पन्न देणाऱ्या या बाजारासंदर्भात संचालक मंडळाने व्यावसायिकांना वेठीस धरल्याची प्रतिक्रिया दिली जात होती. वाहतुकीच्या अडथळ्यांमुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या सामान्य प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागले.