आसोदा-मन्यारखेडा रस्त्यावर सर्विस रोडसाठी शेतकरी आक्रमक
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | जळगाव जिल्ह्यातील जळगाव जवळील मन्यारखेडा परिसरातील शेतकऱ्यांनी तरसोद अंडरपासपासून समांतर (सर्विस) रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी करत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे निवेदन सादर केले आहे. सध्याच्या परिस्थितीत चारपदरी महामार्गामुळे शेतीसाठी जाणे-येणे अत्यंत कठीण झाल्याने शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर निवेदन मा.पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी रोहन घुगे याना देऊन आपल्या व्यथा मांडल्या.
पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत तयार करण्यात आलेला डांबरी रस्ता थेट जुन्या हायवेशी जोडलेला होता. त्या वेळी दोन्ही रस्त्यांची उंची समान असल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व बैलगाडीद्वारे शेतीसाठी आवश्यक साहित्याची ने-आण करणे सोयीचे होते. मात्र, तरसोद ते पाळधी दरम्यान चारपदरी महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर परिस्थिती बदलली आहे.
महामार्गाच्या उंचीमुळे व अंडरपासच्या मर्यादित सुविधेमुळे आसोदा भागातील शेतकऱ्यांना सुमारे ३ ते ४ किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे शेतीची मशागत, खत टाकणे, निंदणी-कोळपणी यांसारखी कामे वेळेवर करणे कठीण होत असून विशेषतः पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेती उत्पादनावरही विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
सदर महामार्गाची पातळी जमिनीपासून सुमारे ५ ते ६ फूट उंच असून, त्यालगत सर्विस रस्त्यांचा अभाव आहे. परिणामी ट्रॅक्टर व बैलगाडीने शेतीत जाणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे मन्यारखेडा नाका ते मामुराबाद रस्ता या दरम्यान समांतर सर्विस रोड तातडीने तयार करावा,अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, अनेक शेतकऱ्यांची जमीन महामार्गाच्या दोन्ही बाजूंना असल्याने शेतीसाठी ये-जा करणे अधिकच कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मन्यारखेडा फाटा ते मामुराबाद रस्ता दरम्यान डिव्हायडरमध्ये दोन ते तीन ठिकाणी क्रॉसिंग देण्याची मागणीही करण्यात आली आहे, जेणेकरून अपघात टाळता येतील आणि शेतीसाठीची वाहतूक सुलभ होईल.
दरम्यान, या मागण्यांवर तात्काळ निर्णय घेऊन अंमलबजावणी न झाल्यास संबंधित विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन व उपोषण करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री, राज्याचे पालकमंत्री, खासदार तसेच जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
सदर निवेदन देते वेळी पुढील शेतकरी व मान्यवर उपस्थित होते.
प्रदीप (बंडु) भोळे ,कुंदन भोळे, राजु महाजन, केशव महाजन, किरण नेहते, स्वप्नील चौधरी,दिगंबर महाजन,संजू पाटील, प्रदीप पाटील, जितू भोळे हरी महाजन , निलेश माळी , चेतन महाजन , डाँ विश्वनाथ खडके , जितू खडके, मधुकर माळी, अरुण माळी व सर्व शेतकरी बंधू उपस्थित होते.
सदर निवेदनाच्या प्रति ना. नितीनजी गडकरी, केंद्रीय रस्ते मंत्री, व वाहतूक आणि महामार्ग मंत्री भारत सरकार. ना. गुलाबरावजी पाटील सो. कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री महाराष्ट्र. खासदार स्मिताताई पाटील, केंद्रीय मंत्री खासदार रक्षताई खडसे, केंद्रीय मंत्री, भारत सरकार. जिल्हाधिकारी सो. जळगाव, अधीक्षक अभियंता, दक्षिण सार्वजनिक विभाग, जळगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत.
