पंढरपूरात संत मुक्ताई पालखी सोहळ्यास सुप्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांची भेट
पंढरपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दाखल झालेल्या संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळ्याचा आज पंढरपूरात दुसरा दिवस. ‘होम मिनिस्टर’ फेम सुप्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांनी आज पालखी सोहळ्यास भेट देऊन संत मुक्ताईंचे दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केला.
या वेळी त्यांच्यासोबत अभिनेते विजय अंदलकर आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हे देखील उपस्थित होते. या सर्व कलाकारांनी भक्तिभावाने संत मुक्ताईंचे दर्शन घेतले आणि पालखी सोहळ्याची माहिती जाणून घेतली.
संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रविंद्र भैय्यासाहेब पाटील आणि पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे यांनी सर्व कलाकारांना संत मुक्ताईंच्या कार्याचा व पालखी परंपरेचा सविस्तर परिचय करून दिला.
आज सकाळची कीर्तन सेवा ह.भ.प. शिवशंकर महाराज लांडे यांची तर दुपारची कीर्तन सेवा ह.भ.प. नितीन महाराज अहिर यांची संत मुक्ताई मठ, दत्त घाट, पंढरपूर येथे पार पडली. संत मुक्ताई पालखी सोहळा दि.०९ जुलैपर्यंत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामी असून, दि.१० जुलै २०२५ रोजी पुन्हा श्रीक्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान करणार आहे.
