भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावनशिराबाद

नशिराबाद जवळ ट्रक-डंपरची समोरासमोर भीषण धडक; ट्रक चालकाचा मृत्यू, डंपर चालक गंभीर

केबिनचा चुराडा; चालकाला काढले क्रेनच्या साहाय्याने बाहेर ; जळगाव-भुसावळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

नशिराबाद.मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे ||जळगाव-भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर नशिराबादजवळ गुरुवारी  रात्री सुमारे १० वाजता राखेचा डंपर आणि सोयाबीन वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात ट्रकचालक रमेश चंद्र यादव (वय ५६, रा. उत्तर प्रदेश) यांचा मृत्यू झाला, तर डंपरचालक मुक्तचर अली (रा. मध्य प्रदेश) गंभीर जखमी झाले आहेत. धडकेची तीव्रता एवढी होती की, दोन्ही वाहनांच्या केबिनचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातहून नागपूरच्या दिशेने सोयाबीन घेऊन जाणारा ट्रक (क्र. एमएच ४० बीजी ६२८७) आणि राखेचा डंपर (क्र. एमएच १५ जीडब्ल्यू ३८७९) यांची मकरा फटाक्यांसमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रकचालक रमेश चंद्र यादव हे केबिनमध्ये अडकून पडले. त्यांना बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर त्यांना बाहेर काढून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. डंपरचालक मुक्तचर अली यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांसह ग्रामस्थांचे बचावकार्य

अपघाताची माहिती मिळताच नशिराबादच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल गुणवंत देशमुख यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. स्थानिक ग्रामस्थांनीही या कार्यात मदत केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नारखेडे यांनी त्वरित क्रेनची व्यवस्था केल्याने अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला करण्यात आली. त्यानंतर वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आली.

महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

या भीषण अपघातामुळे जळगाव-भुसावळ महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रात्रीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. महामार्गावरून मोठ्या प्रमाणात धावणारी अवजड वाहने आणि त्यांच्या वेगामुळे दुचाकीस्वारांसह अन्य वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

बायपास, उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

जळगाव-भुसावळ महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी पाळधी-तरसोद बायपास तसेच असोदा उड्डाणपुलाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ही कामे पूर्ण झाल्यास महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याशिवाय महामार्गावर धावणाऱ्या अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी वेगमर्यादा निश्चित करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!