बनावट शालार्थ आयडी घोटाळा : जळगावच्या सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाना अटक, आंबेजोगाईतून घेतले ताब्यात
जळगाव. मंडे टु मंडे न्युज ||राज्यभर गाजत असलेल्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला वेग आला असून, या प्रकरणात जळगावचे सेवानिवृत्त वेतन अधीक्षक राजमोहन हरिप्रसाद शर्मा (वय ५८) यांना अटक करण्यात आली आहे. बनावट शालार्थ आयडीच्या आधारे वेतन अदा करताना आवश्यक अभिलेखांची पडताळणी न केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. नाशिकच्या गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी विशेष पथकाने बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथून त्यांना ताब्यात घेतले. बुधवारी (२८ ऑक्टोबर) नाशिकरोड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
फरार शर्मा यांना आंबेजोगाईतून अटक
उत्तर महाराष्ट्रातील बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू आहे. या प्रकरणात राजमोहन शर्मा यांचा शोध सुरू होता. मात्र, ते पोलिसांना गुंगारा देत असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली होती.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि तपासाधिकारी सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे सापळा रचला. तेथील त्यांच्या पुतण्याच्या घरातून शर्मा यांना ताब्यात घेण्यात आले.त्यानंतर त्यांना नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तपासासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
अभिलेखांची पडताळणी न करताच वेतन दिल्याचा संशय
एसआयटीच्या तपासानुसार, जळगाव जिल्ह्यातील ११ शाळांमधील शिक्षकांच्या वेतनाशी संबंधित प्रकरणात संशयास्पद व्यवहार झाल्याचा आरोप आहे. बनावट शालार्थ आयडीचे ड्राफ्ट अपलोड करण्याच्या प्रक्रियेत सहभाग आणि उपसंचालक कार्यालयाकडील मूळ शालार्थ मंजुरी आदेश उपलब्ध नसतानाही संबंधित अभिलेखांची आवश्यक पडताळणी न करता वेतन अदा केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.
या अनुषंगाने शर्मा यांची भूमिका तपासली जात असून, वेतन वितरण प्रक्रियेत नेमक्या कोणत्या स्तरावर अनियमितता झाली, याचा शोध एसआयटीकडून घेतला जात आहे.
गरूड बंधूंसह हिंगोणेकर यांचे जामीन अर्ज फेटाळले
कोट्यवधी रुपयांच्या कथित बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती घोटाळ्यातील संशयित संस्थाचालक संजय गरूड, त्याचा भाऊ दीपक गरूड आणि तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. बुधवारी नाशिकरोड सत्र न्यायालयाने या तिघांचेही जामीन अर्ज फेटाळून लावले. त्यामुळे त्यांचा कारागृहातील मुक्काम कायम राहणार आहे. आता या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील शाळेशी संबंधित प्रकरणात एजंट म्हणून भूमिका बजावल्याचा आरोप असलेल्या अमोल कुलकर्णी याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एसआयटीने त्याला इंदूर येथून अटक केली होती.
शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयितांची भूमिका, बनावट नियुक्त्यांमागील कथित आर्थिक व्यवहार आणि वेतन वितरणातील अनियमितता यांचा तपास सध्या सुरू आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

