नशिराबाद खुनाचे हादरले : पतीनेच केली पत्नीची कोयत्याने निर्घृण हत्या
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | दि. २२ जून : नशिराबाद येथील भवानी नगर परिसरातील भिलवाडी येथील रहिवासी सोमवारी दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेत पतीनेच पत्नीवर धारदार कोयत्याने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी पतीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
मंदाबाई विकास जाधव या मूळच्या रायपूर कंडारी येथील रहिवासी असून नंतर त्या चिचखेडा (ता. जामनेर) येथे वास्तव्यास होत्या. सध्या त्या नशिराबाद येथील भवानी नगरमधील भिलवाडी परिसरात राहत होत्या. आपल्या मुलाला जिल्हा परिषद मराठी शाळेत प्रवेशासाठी आणले असताना ही घटना घडली. सदर घटना ही सुनसगाव रोड वरील खंडेराव मंदिर समोर घडली.
मृत मंदाबाई या रामा सोमा बागले यांची कन्या तसेच विकास जगन्नाथ जाधव यांची पत्नी होत्या. सोमवारी (दि. २२ जून) दुपारी सुमारे २ ते २.२० वाजण्याच्या दरम्यान आरोपी विकास जगन्नाथ जाधव याने धारदार कोयत्याने त्यांच्या मानेवर व डोक्यावर सहा वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेच्या वेळी आरोपी दारूच्या नशेत असल्याचेही सांगितले जात आहे.
घटनेनंतर आरोपीने पळून जाण्याचा निष्फळ प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला ताब्यात घेण्यात यश मिळविले. घटनेची माहिती मिळताच जळगाव येथून फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे.
यंत्रणेची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) केदार बारबोले, नशिराबाद पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी योगिता नारखेडे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी संशयित आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. माहितीच्या आधारे पोलीस तपास सुरू असून तपासात घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

