इन्स्टाग्राम ओळखीतून जवळीक : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जामनेर तालुक्यात तरुणीवर वारंवार अत्याचार
जामनेर, मंडे टु मंडे न्युज | सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीला लॉजवर नेऊन तिचे फोटो काढले. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यात समोर आला आहे. या प्रकरणी नेरीदिगर येथील भूषण रवींद्र पाटील याच्याविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इन्स्टाग्रामवरून झाली ओळख
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय पीडित तरुणीची संशयित भूषण पाटील याच्याशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर जवळकीत झाल्यानंतर संशयिताने तरुणीला जामनेर येथील एका लॉजवर नेले. तेथे तिचे फोटो मोबाईलमध्ये काढण्यात आले.
यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत संशयिताने तरुणीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. मार्च 2026 ते 28 ऑगस्ट 2026 या कालावधीत हा प्रकार वारंवार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
त्रास असह्य झाल्यानंतर पोलिसांत तक्रार
सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने जामनेर पोलीस ठाणे गाठत संशयिताविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भूषण रवींद्र पाटील याच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदेश किर्तीकर करीत आहेत.


