शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास तीव्र; कुऱ्हा काकोडा येथील फडके विद्यालयात नाशिकच्या पथकाची झाडाझडती
अंतुर्लीनंतर तपासाचे पथक कुऱ्हा काकोड्यात; भरतीच्या मूळ कागदपत्रांची कसून पडताळणी
मुक्ताईनगर. मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी || राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला वेग आला असून, नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्लीनंतर आता कुऱ्हा काकोडा येथील शाळेत तपास सुरू केला आहे. मंगळवारी दुपारी पथकाने येथील प. पू. माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्थेच्या स्वर्गीय अशोक फडके माध्यमिक विद्यालयात भेट देत भरतीशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली.
या विद्यालयात कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी मिळवून नियमबाह्य शिक्षक भरती करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर तपास पथकाने शाळेतील महत्त्वाच्या नोंदींची पडताळणी केली.
भरतीच्या मूळ नस्तींची तपासणी
मंगळवारी दुपारी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी विद्यालयात दाखल झाले. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गैरहजर होते, तर संस्थेचे सचिव भालचंद्र कुलकर्णी उपस्थित असल्याचे समजते.
तपास अधिकाऱ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसंदर्भातील मूळ नस्ती, सेवक संच, रुजू अहवाल आणि शालार्थ आयडीशी संबंधित महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली. भरती प्रक्रिया आणि संबंधित नोंदींची सत्यता पडताळण्यावर पथकाचा भर असल्याचे समजते.
सायंकाळपर्यंत पडताळणी सुरू
मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत विद्यालयातील कागदपत्रांची तपासणी सुरू होती. या पडताळणीतून नेमकी कोणती माहिती समोर येते आणि पुढील तपासात कोणत्या बाबी स्पष्ट होतात, याकडे लक्ष लागले आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्याच्या अनुषंगाने तपास यंत्रणांकडून विविध शाळांमधील भरती प्रक्रिया आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जात असल्याने या प्रकरणातील पुढील घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

